भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह पुन्हा येण्यासाठी काही करसवलती देण्याची मागणी देशातील विविध भांडवली बाजारांच्या एका व्यासपीठ गटाने केली आहे. बाजारातील प्राथमिक भागविक्री प्रक्रियेदरम्यान निवडक रोख्यांना सुरक्षेच्या जाळ्यात आणावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.
देशातील विविध भांडवली बाजारातील सदस्यांचे देशव्यापी नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष प्रसाद राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा ओघ गेल्या काही दिवसांमध्ये कमालीचा रोडावला आहे. त्यासाठी बाजारातील गुंतवणूकदारांना काही करसवलती देता येतील, असे सरकारने पाहावे. कंपन्यांच्या प्राथमिक भागविक्री प्रक्रियेदरम्यान सेबीद्वारे गुंतवणूकदारांना पुरविण्यात येणारे संरक्षक जाळे कंपन्यांच्या काही अपरिवर्तनीय रोख्यांनाही देण्यात यायला हवे. याबाबत आम्ही भांडवली बाजार नियामक सेबीलाही पत्र लिहिले आहे. सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनीही याबाबत नुकतेस सूतोवाच केले होते.
संघटनेमार्फत येत्या शुक्रवारपासून दोन दिवसांचा आंतरराष्ट्रीय समारंभ होऊ घातला आहे. भांडवली बाजार आणि नियामक यांना भेडसावणाऱ्या आव्हानांचीही या परिषदेत चर्चा होईल, अशी माहिती राव यांनी दिली.