गुंतवणूकदारांना ‘सेबी’कडे दावा करण्याचे आवाहन
तीन वर्षांत दुप्पट रकमेचे तसेच बदल्यात जागेचे आमिष दाखवून सहा कोटी गुंतवणूकदारांना गंडविणाऱ्या पीएसीएल (पर्ल्स)च्या दाव्यांची प्रक्रिया सेबीच्या कारवाईनंतर सुरू होत आहे. यासाठी ‘ऑल इंडिया पीएसीएल (पर्ल्स) असोसिएशन’ने गुंतवणूकदारांना देशभरातून दावे करण्याचे आवाहन केले आहे.
गेली तीन दशके गुंतवणूकदारांकडून ४९,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा करणाऱ्या पर्ल्स कंपनीकरिता दावे करण्याकरिता संघटनेकडे छापील अर्ज सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. हे अर्ज संघटनेच्या कार्यालयात उपलब्ध असून संघटनेच्या सभासदांनाच ते मिळतील व त्याकरिता आवश्यक प्रक्रिया पार पाडूनच ते स्वीकारले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संघटना हे दावेकर्त्यांचे हे अर्ज व त्यासोबत असलेल्या गुंतवणूक पुराव्यासह (प्रमाणपत्रांच्या सत्य प्रती) येत्या १५ जानेवारी रोजी भांडवली बाजार नियामक सेबीच्या मुंबईतील मुख्यालयावर धडकणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली. संघटनेचे छापील अर्ज राज्यात विभागीय स्तरावर (मुंबई, नाशिक, कोल्हापूर, परभणी, नागपूर) उपलब्ध करून देण्यात येत असून परभणी व मुंबईत दोन ठिकाणी २८ डिसेंबरपासून ते स्वीकारले जातील.