पंजाब नॅशनल बँकेचा समभाग सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविणारा ठरला. या तीन व्यवहारात बँकेचे बाजार भांडवल ८,७०० कोटी रुपयांनी खाली आले. गेल्या दोन व्यवहारातील १० टक्के घसरणीच्या तुलनेत पंजाब नॅशनल बँकेच्या समभागातील आपटी शुक्रवारी कमी होती. त्याचबरोबर शुक्रवारी बँक क्षेत्रातील स्टेट बँक हा सेन्सेक्समधील घसरणीच्या यादीत अव्वल राहिला. पीएनबीशी असलेल्या आर्थिक संबंधामुळे यूनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, अ‍ॅक्सिस बँक तसेच स्टेट बँक यांचेही मूल्य रोडावले.

निफ्टीच्या दफ्तरी बँक निर्देशांक २.४९ टक्क्य़ांनी घसरला. येथे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आदी ३.५५ टक्क्य़ांपर्यंत खाली आले. तर मुंबई शेअर बाजारात यूनियन बँक ऑफ इंडिया १.२५ टक्क्य़ांनी घसरला.  आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक हेही घसरले.

बँक क्षेत्रातील सर्वोच्च घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या गीतांजली ज्वेल्सचे समभाग मूल्य शुक्रवारी तब्बल २० टक्क्य़ांनी आपटले. गीतांजली ज्वेल्सही सलग तिसऱ्या सत्रातील आपटीमुळे ३०० कोटी रुपयांची बाजार भांडवली नुकसान सोसणारा ठरला. त्याचबरोबर टीबीझेड, राजेश एक्स्पोर्ट्स, पीसी ज्वेलर्स आदीही घसरणीत सहभागी झाले.

एकूणच देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याचे सावट सप्ताहअखेरही भांडवली बाजारात कायम राहिले. सेन्सेक्स शुक्रवारी एकाच व्यवहारात त्रिशतकी निर्देशांक आपटी नोंदविताना ३४ हजारावर येऊन ठेपला. तर निफ्टीत जवळपास शतकी निर्देसांक घसरण नोंदली गेली. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा निर्देशांक १०,५०० च्या खाली विसावला. दोन्ही बाजारांची सप्ताह कामगिरीही स्थिरच राहिली.