सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी विविध कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या असून, टाटा समूह आणि स्पाइसजेटचे प्रवर्तक या स्पर्धेत उतरले आहेत. यापूर्वी दोनदा प्रयत्न फसल्यानंतर, केंद्र सरकारने निर्गुंतवणूक योजनेअंतर्गत सुरू केलेल्या ‘एअर इंडिया’च्या लिलावाद्वारे १०० टक्के हिस्सा विक्रीच्या प्रक्रियेची मुदत वाढवली होती.

टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचे राष्ट्रीयीकरण करून तिचेच सध्याच्या एअर इंडियामध्ये रूपांतरण करण्यात आले होते. आता सुमारे ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या त्याच एअर इंडियाला विकत घेण्यासाठी टाटा समूह आखाड्यात उतरला आहे. त्याचबरोबर स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनीदेखील एअर इंडियाच्या खरेदीसाठी स्वारस्य दाखविले आहे.

‘एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आर्थिक निविदा प्राप्त झाल्या आहेत. तसेच प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे,’ अशी माहिती ‘दीपम’ अर्थात निर्गुंतवणूक विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ट्विटद्वारे दिली.

केंद्र सरकारने २७ जानेवारी २०२० रोजी प्राथमिक माहिती दस्त प्रसृत करून एअर इंडियाच्या १०० टक्के हिस्सा खरेदीसाठी इरादा पत्रांची मागणी करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. मात्र त्यांनतर करोनाच्या साथीमुळे एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रकियेचाही खोळंबा झाला. सरकारने ही हवाई सेवा कंपनी चालविणे अवघड बनले असल्याचे सुचवत, तिचे १०० टक्के भागभांडवल, त्याचप्रमाणे ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ या अन्य सेवेतील तिचा १०० टक्के  हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सव्र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे.