रासायनिक प्रकल्प, ऊर्जानिर्मिती केंद्रे, तेल शुद्धीकरण व मलनिस्सारण प्रकल्प, साखर कारखाने आणि वातानुकूलन संयंत्र यात वापरात येणाऱ्या हिट एक्स्चेंजर्स उपकरणांच्या निर्मितीसाठी जर्मनीच्या फुन्का आणि सूरतस्थित पूजा हिटेक्स लिमिटेड यांनी अनुक्रमे २५:७५ या भागीदारीतून उत्पादन प्रकल्प थाटण्याची घोषणा मंगळवारी येथे केली. जर्मन भागीदाराकडून या निमित्ताने पुढील पाच वर्षांत ५ कोटी युरो (अंदाजे ३५० कोटी रुपयांची) गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आवाहनानुसार, भारतातील मागणी भागवून, आशियाई व आखाती देशांत निर्यातीसाठी या संयुक्त प्रकल्पातून उत्पादन घेतले जाईल, असे हा भागीदारी व्यवहार मार्गी लावणाऱ्या अल्कोर फंड या अमेरिकास्थिती खासगी गुंतवणूक संस्थेचे भारतातील प्रभारी थॉमस मॅथ्यू यांनी सांगितले. ‘फुन्का हिटेक्स इंडिया प्रा. लि.’ या नावाने सुरू होणारा संयुक्त प्रकल्प म्हणजे जर्मन अभियांत्रिकी गुणवत्तेची, भारतीय मूल्यातील उपलब्धतेचा नमुना ठरेल, असा विश्वास पूजा हिटेक्स इंजिनीयरिंग लि.चे व्यवस्थापकीय संचालक अर्पण पटेल यांनी व्यक्त केला.
हा नवीन प्रकल्प पूजा हिटेक्सच्या सूरतमधील प्रकल्पानजीकच उभारला जाणार आहे. पूजा हिटेक्सने अलीकडेच ६ मेगाव्ॉट क्षमतेचा स्व-वापरासाठी औष्णिक ऊर्जाप्रकल्प कार्यान्वित केला आहे.