जागतिक मानांकन संस्थांकडून ‘पतझडी’चा इशारा

नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी या फरार हिरे व्यापाऱ्यांनी केलेला ११,४०० कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, सलग पाच कामकाज झालेल्या व्यवहारात पंजाब नॅशनल बँकेच्या समभागामध्ये निरंतर घसरण सुरूच आहे. भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील आजवरचा सर्वात मोठय़ा घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जागतिक मानांकन संस्थांनी बँकेच्या पतमानांकनाबाबत गंभीर फेरविचाराचा इशारा दिला असून, भागधारकांना यापुढेही आणखी मूल्य ऱ्हासाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या सत्रात पीएनबीच्या समभागाने ४.६ टक्क्यांच्या घसरगुंडीसह वर्षांतील (५२ सप्ताहातील) नीचांक म्हणजे १११ रुपयाला गवसणी घातली. आधीच्या पाच दिवसातील समभागाची एकूण घसरण ३१ टक्क्यांच्या घरात जाणारी आहे. या घसरणीतून पीएनबीच्या भागधारकांचे एकूण १२,७०० कोटी रुपयांचे गुंतवणूक मूल्य मातीमोल झाले आहे. हा महाघोटाळा बँकेकडून १४ फेब्रुवारीला सकाळी शेअर बाजाराला दिल्या गेलेल्या औपचारिक सूचनेतून पटलावर आला होता.

जागतिक पतमानांकन संस्था मूडीज् इन्व्हेस्टर सव्‍‌र्हिस आणि फिच रेटिंग्ज यांनी घोटाळ्यापश्चात पंजाब नॅशनल बँकेच्या नक्त मालमत्तेतील ऱ्हास आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेला संभवणारा मोठा तोटा पाहता, तिला दिलेल्या पतमानांकनाचा नव्याने विचार क्रमप्राप्त असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पतमानांकन संस्थांनी स्वतंत्रपणे प्रसिद्धीस दिलेल्या टिपणांत, पतमानांकनात घसरण केल्या जाण्याच्या शक्यतेची पुष्ठी केली आहे. घोटाळ्यांच्या व्यवहारांची व्याप्ती आणि तिचा बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम, नियंत्रकांकडून बँकेवर केली जाणारी दंडात्मक कारवाई तसेच बँकेच्या भांडवली स्थितीत सुधारासाठी व्यवस्थापनाकडून टाकली जाणारी पावले या गोष्टींवर येत्या काळात नजर असेल, असे या मानांकन संस्थांनी स्पष्ट केले आहे.

‘सेन्सेक्स’वर घसरणीचा दबाव कायम

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळ्याचे भांडवली बाजारावरील सावट सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिले. मंगळवारच्या व्यवहाराच्या अंतिम टप्प्यात सेन्सेक्ससह निफ्टी अधिक घसरले. ३४ हजारापर्यंत पोहोचू पाहणाऱ्या सेन्सेक्सची सत्रअखेर सोमवारच्या तुलनेत ७१.०७ अंश घसरणीने ३३,७०३.५९ वर स्थिरावण्याने झाली. तर १८ अंश नुकसानासह १०,३६०.४० पर्यंत थांबला. मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग दोन व्यवहारांत ५०० हून अंशांची आपटी अनुभवली आहे.

मंगळवारच्या बँक समभागांच्या घसरणीत सार्वजनिक बँकांच्या समभागांबरोबरच खासगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश राहिला. पीएनबीसाठी फिच पतमानांकन संस्थेने दिलेल्या ताज्या दर्जाची दखलही बँक समभागांनी घेतली. तर पीएनबी प्रकरणातील नीरव मोदी याच्या गीतांजली जेम्सचा समभाग मुंबई शेअर बाजारात १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपटला.

भांडवली बाजारात मंगळवारी डॉलरच्या तुलनेत मोठय़ा फरकाने घसरलेल्या रुपयाचेही सावट राहिले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांवरही परकी चलन व्यवहाराचा परिणाम दिसला. केवळ माहिती तंत्रज्ञानासह सार्वजनिक उपक्रम हे क्षेत्रीय निर्देशांक मंगळवारच्या व्यवहारात तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक ०.१५ टक्क्यापर्यंत घसरले. मुंबईच्या शेअर बाजारात अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग दीड टक्क्याहून अधिक प्रमाणात खाली आले.

रुपया ५८ पैशांनी रोडावून तिमाही तळात

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मंगळवारी मोठय़ा फरकाने खाली आहे. परकी चलन विनिमय मंचावर रुपया आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात तब्बल ५८ पैशांनी रोडावत ६४.७९ वर स्थिरावला. व्यवहारात स्थानिक चलन ६४.८६ पर्यंत खाली आले होते. सोमवारच्या तुलनेत त्यात एकाच व्यवहारात जवळपास एक टक्क्याची आपटी नोंदली गेली.