वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या डीएलएफ लिमिटेडचा सिनेमागृह व्यवसाय या क्षेत्रातील आघाडीच्या पीव्हीआरकडे आला आहे. २९ पडदे असलेल्या डीटी सिनेमाजची पीव्हीआरने ५०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. पाच वर्षांपूर्वी उभयांमध्ये अपयशी ठरलेली खरेदी-विक्री प्रक्रिया अखेर यंदा पूर्ण झाली आहे.
डीएलएफच्या संचालक मंडळाच्या मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीच्या या कंपनीने ही माहिती मुंबई शेअर बाजारालाही कळविली आहे. खुल्या भागविक्री प्रक्रियेत सेबीचा दंड बडगा झेललेल्या डीएलएफ समूहावर २०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.
डीटी सिनेमाजचे ६,००० हून आसनक्षमतेचे २९ पडदे आहेत. तर ४६७ पडदे असणाऱ्या पीव्हीआरची संख्या आता नव्या खरेदीमुळे ५०६ होणार आहे. यामुळे पीव्हीआरच्या मालमत्ताही १०५ हून ११५ वर जाणार आहेत.
डीएलएफचा सिनेमागृह व्यवसाय खरेदी करण्याच्या करारावर यापूर्वी नोव्हेंबर २००९ मध्येही स्वाक्षरी झाली होती. मात्र तीनच महिन्यांत हा व्यवहार अपयशी ठरला.
सिनेपॉलिस नावाने सिनेमागृह चालविणाऱ्या मेक्सिकनने एस्सेल समूहाच्या फन सिनेमाजवर यंदाच्या जानेवारीमध्येच ताबा घेतला. तर यापूर्वी नेटवर्क१८ ने स्टारगेझ एन्टरटेनमेन्टमधील हिस्सा कार्निव्हल फिल्म्सला विकत या क्षेत्रातून माघार घेतली. याच कार्निव्हल समूहाने अनिल अंबानी यांच्या बिग सिनेमाजची डिसेंबर २०१४ मध्ये ७०० कोटी रुपयांना खरेदी केली होती. जुलै २०१४ मध्ये आयनॉक्सने सत्यम सिनेप्लेक्स घेत उत्तर भारतातील आपले स्थान अधिक बळकट केले.