सणोत्सवपर्वाच्या तोंडावर देशातील वाहन निर्मात्यांना सुखावणारा क्षण म्हणजे सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री ही १७ टक्क्यांची वाढ दर्शविणारी राहिली आहे. या उद्योग क्षेत्राची संघटना ‘सियाम’ने विक्रीची ही आकडेवारी शुक्रवारी प्रसिद्ध केली.

आर्थिक वर्षांच्या या दुसऱ्या तिमाहीत ७,२६,२३२ चारचाकी प्रवासी वाहनांची विक्री झाली, असे ‘सियाम’ने गोळा केलेली आकडेवारी सांगते. २०१९ सालातील याच जुलै ते सप्टेंबर अशा तीन महिन्यांतील एकत्रित विक्रीचा आकडा हा ६,२०,६२० इतका होता. बरोबरीने दुचाकींची विक्री सरलेल्या तिमाहीत ४६,९०,५६५ इतकी झाली, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत ४६,८२,५७१ अशी होती. करोना आजारसाथीच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक वाहनांतून प्रवासापेक्षा स्वमालकीच्या वाहनांतून जाणे-येणे अधिक सुरक्षित वाटत असल्याने, लोकांचा वाहनखरेदीकडे होरा वळला आहे, असाच विक्रीतील वाढीचा अर्थ असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एरव्ही मागणीला बहर असणाऱ्या सणोत्सवांच्या आगामी तिमाहीबाबत वाहन निर्मात्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

वाणिज्य वापराच्या वाहनांची विक्री मात्र सप्टेंबर तिमाहीत २०.१३ टक्क्यांनी म्हणजे गेल्या वर्षांतील याच तिमाहीतील १,६७,१७३ वरून यंदाच्या तिमाहीत १,३३,५२४ अशी घसरली आहे. तीनचाकी वाहनांची विक्री तर तब्बल ७४.६३ टक्के गडगडून अवघी ४५,९०२ इतकीच जुलै ते सप्टेंबर तिमाहीत होऊ शकली आहे. सलग सहाव्या तिमाहीत वाणिज्य वाहनांच्या विक्रीने आधीच्या तुलनेत घसरण दाखविली आहे.

पेट्रोल-डिझेल विक्रीही पूर्वपदावर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात डिझेलची विक्री मागील वर्षांतील याच काळाच्या तुलनेत ८.८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलच्या विक्रीने करोनापूर्व स्तरावर फेर धरला आहे. तेल कंपन्यांकडून गोळा आकडेवारीनेच ही माहिती पुढे आणली आहे. पेट्रोलची विक्री गेल्या महिन्यापासून पूर्वपदावर आल्याचे दिसून आले.