भारताच्या अदानी समूहाच्या कंपनीस ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे कारमायकेल कोळसा खाण प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिल्याच्या विरोधात पर्यावरणवाद्यांनी अडाणी समूहाला क्वीन्सलँडमधील जमीन विषयक दाव्यांच्या न्यायालयात खेचले आहे.

‘कोस्ट अँड कंट्री’ या संस्थेचे डेरेक डेव्हीस यांनी पाच आठवडे अडानी समूहाविरोधात कायदेशीर लढाई चालवली आहे. डेव्हीस यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठी कोळशाची खाण अडानी समूहाला मिळाली असून त्यामुळे जगाची तापमानवाढ होईल व प्रगती राहणे दूरच राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, या खाण प्रकल्पासाठी अडाणी समूहाला स्टेट बँकेने कर्जमंजुरीचा करार करण्यात आला.
जलतज्ज्ञ, सागरी वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ यांच्याशी सल्लामसलत करूनच अडानी समूहाला न्यायालयात खेचले आहे. त्यांना मंजूर केलेली कोळसा खाण नामंजूर करण्यात यावी. अडानी समहूला क्वीन्सलँडमध्ये पाऊल टाकू देऊ नये. कारमिकेल खाण २८० चौरस किलोमीटरची असून ती ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी खाण आहे व त्यासाठी ३०० कि.मी.चा रेल्वे मार्ग वापरून दरवर्षी ६० मेट्रिक टन कोळसा वाहून नेला जाणार आहे.
अडानी समूहाने असा दावा केला आहे की, गॅलिली खोऱ्याच्या सीमेवर हजारो रोजगार यामुळे तयार होणार असून क्वीन्सलँडच्या अर्थव्यवस्थेत कोळसा स्वामित्वधन व इतर मार्गाने मोठय़ा प्रमाणात डॉलर्सची भर पडणार आहे.
अडानी समूहास खाण देणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद करताना डेरेक यांनी सांगितले की, ग्रेट बॅरिअर रीफवर त्याचा परिणाम होणार असून क्वीन्सलँडमधील पर्यटन व्यवसाय व अर्थकारणावर नकारात्मक परिणाम होणार आहे.माजी सरकारने केलेल्या निर्णयांवर खाण उद्योगाने प्रभाव टाकला असा आरोपही त्यांनी केला. ‘कोस्ट अँड कंट्री’ ही वकिलांची स्वतंत्र संस्था असून ती क्वीन्सलँडमध्ये कार्यरत आहे.

‘कॅनन’ दालनांची संख्या २०० वर नेणार
मुंबई : डिजिटल इमेजिंग क्षेत्रातील जागतिक अग्रणी ‘कॅनन’ने फोटोग्राफी आणि फोटो प्रिंटिंग उपाययोजना एकात्मिक स्वरूपात एकाच ठिकाणी सादर करणारे ‘कॅनन इमेज स्क्वेअर’ (सीआयएस) दालन मुंबईत अंधेरी (पूर्व) येथे विशाल हॉलनजीक शॉपिंग सेंटरमध्ये मंगळवारी सुरू केले. कॅनन इंडियाचे वरिष्ठ संचालक अँड्रय़ू कोह यांनी महाराष्ट्रातील या धर्तीच्या १२ व्या दालनाचे उद्घाटन केले. सध्याच्या घडीला १३२ सीआयएस दालने देशभरातील प्रमुख ६७ शहरांत कार्यरत आहेत. चालू वर्षांत डिसेंबपर्यंत ही संख्या २०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन असल्याचे कोह यांनी सांगितले. सीआयएस दालनाअंतर्गत कॅननच्या डिजिटल एसएलआर तसेच नवीन कॉम्पॅक्ट कॅमेरा उत्पादनांची विस्तृत श्रेणी, ट्रायपॉड, चार्जर्स वगैरे पूरक सामग्री तसेच विविध प्रिंटिंग सेवा उत्पादनांची प्रत्यक्ष अनुभूती ग्राहकांना घेता येते. महाराष्ट्र हे कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाची बाजारपेठ असून पुणे-मुंबईव्यतिरिक्त उदयोन्मुख नव्या शहरांमध्ये आणखी काही दालने सुरू करण्याचे नियोजन असल्याचे कोह यांनी स्पष्ट केले.

जीपी पारसिक बँकेची ५०वी शाखा डोंबिवलीत
ठाणे : गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेडची ५०वी शाखा अलीकडेच डोंबिवली (पूर्व) येथे कार्यान्वित झाली. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील या वेळी उपस्थित होते. बँकेला नुकताच मल्टी स्टेट शेडय़ूल्ड दर्जा मिळाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. बँकेचा एकूण व्यवसाय ३,४०० कोटी रुपयांच्या वर गेला असून, यामध्ये २,१५० कोटी रुपयांच्या ठेवी, तर १,२५० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचा समावेश आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेने ५८ कोटींचा ढोबळ, तर २४ कोटी रुपये निव्वळ नफा कमविला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बँकेचा अंतर्भाव ‘आर्थिकदृष्टय़ा सक्षम आणि सुयोग्य नियोजित बँक’ या गटात करण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.