चालू महिन्याच्या प्रारंभी घेतला गेलेला रेपो दरात पाव टक्का कपातीचा निर्णय हा रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणविषयक बाह्य़ सल्लागार मंडळातील बहुमताचा कौल पाहूनच गव्हर्नर रघुराम राजन यांनी घेतला, असे रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या कार्यवृत्तावरून स्पष्ट झाले आहे.
बाह्य़ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या तांत्रिक सल्लागार मंडळातील पाच सदस्यांपैकी चार जणांनी रेपो दर कपातीची शिफारस केली होती. कपात सुचविणाऱ्या चार जणांमध्ये दोघांनी पाव टक्क्य़ांची तर दोघांनी अर्धा टक्का कपात व्हावी असे मत नोंदविले होते. शंकर आचार्य, अरविंद वीरमणी, एरोल डिसूझा, अशिमा गोयल आणि चेतन घाटे या पाच जणांचे हे मंडळ आहे.
महागाई दराबाबत समाधानाची स्थिती असताना, आर्थिक विकासाला चालना देणारी व्याज दर कपात ही आवश्यक ठरेल, असे कपात सुचविणाऱ्या सदस्यांचे मत होते. त्या उलट खनिज तेलाच्या किमतींतील उसळी देशांतर्गत महागाईत वाढीला कारण ठरू शकेल असे एका सदस्याचे मत होते.