चेतक, प्रियासारखी स्कूटर तसेच सनीसारखी मोपेड याद्वारे खऱ्या अर्थाने देशात ‘हमारा बजाज’चे पर्व रुजवणारे राहुल बजाज हे बजाज ऑटोच्या अ-कार्यकारी अध्यक्षपदावरून दूर झाले आहेत. त्यांचे चुलत बंधू नीरज बजाज यांच्याकडे शनिवारपासून कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात येत आहेत.

राज्यसभेचे खासदार राहिलेले राहुल बजाज येत्या पाच वर्षांसाठी बजाज ऑटोचे मानद अध्यक्ष असतील. ८३ वर्षीय राहुल बजाज मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावरील विरोधी मताबाबत चर्चेत राहिले आहेत. बजाज समूहात ते गेल्या पाच दशकांपासून आहेत.

बजाज समूहाचे संस्थापक जमनालाल बजाज यांचे राहुल हे ज्येष्ठ नातू. समूहात ते १९६५ मध्ये दाखल झाले. तर बजाज ऑटोमध्ये ते १९७२ पासून आहेत. कंपनीची चेतक स्कूटर ही त्यांचीच कल्पना होती. प्रिया, सनी आदी दुचाकीही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. ८० च्या दशकात या नवागत वाहन गटाद्वारे आगेकूच करणाऱ्या कंपनीत राहुल बजाज यांनी ९० च्या दशकातील उदारीकरण प्रारंभाच्या माध्यमातून दुचाकी वाहन गटात अव्वलता प्रदान करताना स्कूटर या वाहन प्रकारावर अधिक भर दिला.

राहुल बजाज २००६ ते २०१० दरम्यान राज्यसभेचे खासदार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वारंभातच त्यांनी धोरणांविरुद्ध जाहीर टीका केली होती. पुणेस्थित मुख्यालय व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहननिर्मिती प्रकल्प असलेल्या बजाज ऑटोच्या स्कूटर उत्पादन बंद करण्यावरून त्यांचे पुत्र राहुल यांच्याबरोबरचे मतभेद समोर आले होते.

भांडवली बाजारात सूचिबद्ध बजाज ऑटो ७.२ कोटी रुपयांवरून आता १२,००० कोटी रुपयांची कंपनी झाली आहे. समूहात ४० हजारांहून अधिक मनुष्यबळ असून बाजार भांडवल ८०,००० कोटी रुपये आहे.

कोण आहेत नीरज बजाज?

६७ वर्षीय नीरज बजाज हे राहुल बजाज यांचे चुलत बंधू आहेत. नीरज बजाज यांनी बजाज समूहातील मुकंद कंपनीचे अध्यक्षपद भूषविले आहे. बजाज समूहात गेल्या २५ वर्षांपासून असणाऱ्या नीरज बजाज यांनी तत्पूर्वी समूहातील बजाज ऑटो तसेच बजाज इलेक्ट्रिकल्समध्येही वरिष्ठ पदावर जबाबदारी पार पाडली आहे. तसेच बजाज अलायन्झ लाइफ आणि जनरल इन्शुरन्स, जमनालाल सन्ससारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते आहेत. बजाज हिंदुस्थानचे अध्यक्ष शिशिर बजाज हे राहुल बजाज यांचे, तर बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर व बजाज ऑटोचे उपाध्यक्ष मधुर बजाज हे नीरज यांचे सख्खे भाऊ आहेत. टेनिसपटू ‘अर्जुन’ पुरस्काराचे मानकरी नीरज यांनी इंडियन मर्चंट्स चेंबरचे अध्यक्षपदही भूषविले आहे.