उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज फायनान्सच्या नॉन एक्स्झिक्युटिव्ह चेअरमनपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै रोजी ते या पदावरून कार्यमुक्त होणार आहेत. गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी ते या कंपनीशी जोडले गेले होते. कंपनीनं नियामक मंडळाला दिलेल्या माहितीनुसार त्यांची जागा आता कंपनीचे उपाध्यक्ष संजीव बजाज हे घेणार आहेत. ते नॉन एक्स्झिक्युटिव्ह नॉन इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहितीही कंपनीनं यावेळी दिली.

राहुल बजाज हे १९८७ मध्ये कंपनीची स्थापना झाल्यापासून नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम करत आहेत. तसेच, ते मागील गेल्या अनेक वर्षांपासून समुहात सक्रिय आहेत. सक्सेशन पॉलिसीनुसार त्यांनी ३१ जुलै २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसभा सदस्यपदही मिळालं

राहुल बजाज यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय त्यांनी कायद्याचं शिक्षणही घेतलं आहे. राहुल बजाज यांनी कमी वयातच बजाज ऑटोची जबाबदारी स्वीकारली होती. १९६८ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. २००५ मध्ये त्यांनी बजाज समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव बजाज यांनी या समूहाचे व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं स्वीकारली होती.

बजाज हे २००६ ते २०१० या कालावधीत राज्यसभेचे सदस्यदेखील होती. तसंच त्यांचा पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मान करण्यात आला होता. २०१६ मध्ये फोर्ब्सच्या यादीतल २.४ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह ते जगातील अब्जाधिशांच्या यादीत ७२२ व्या स्थानावर होते.