रेल्वे अर्थसंकल्पाबाबत सावध पवित्रा
सलग तिसऱ्या व्यवहारात मोठी आपटी नोंदवत दोन्ही प्रमुख निर्देशांक हे त्यांच्या अनोख्या टप्प्यावर स्थिरावले. ३२१.२५ अंश घसरणीसह सेन्सेक्स बुधवारी २३,०८८.९३ पर्यंत खाली आला. तर ९०.८५ अंश घसरणीसह निफ्टी ७,०१८.७० पर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय बाजारात ३० डॉलर प्रति पिंपपर्यंत घसरलेल्या खनिज तेलदराच्या चिंतेसह बाजाराचा गुरुवारी सादर होत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाबाबत सावध पवित्रा दिसून आला.
बाजार आता गेल्या पंधरवडय़ाच्या तळात विसावला आहे. मंगळवारीही मुंबई निर्देशांक ३७९ अंशांनी घसरला होता. गेल्या दोन व्यवहारातील एकूण सेन्सेक्स आपटी ७०० अंशांची राहिली आहे. महिन्याच्या वायदापूर्तीच्या व्यवहाराची गुरुवारी अखेर आहे. त्याचबरोबर संसदेत सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पावरही बाजाराची गुरुवारी नजर असेल. तर शुक्रवारचा आर्थिक पाहणी अहवाल व येत्या सोमवारच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींवरही बाजाराचा प्रवास पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
व्यवहारात किरकोळ वधारत असलेल्या डॉलरच्या तुलनेतील रुपयापेक्षा सौदी अरेबियाने खनिज तेल उत्पादन कपातीबाबत कोणताही निर्णय न घेतल्यावर बाजाराने अधिक प्रतिक्रिया नोंदविली.
सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांचे मूल्य बुधवारी घसरले. यामध्ये भेल, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश राहिला. तर समभागमूल्य वाढलेल्या समभागांच्या यादीत भारती एअरटेल, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, एशियन पेंट्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आदी सहभागी झाले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक २.६२ टक्क्य़ांनी त्याचबरोबर आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, बँक, सार्वजनिक कंपन्या आदी निर्देशांक १.७२ ते १.२९ टक्क्य़ांपर्यंतची घसरण नोंदवित होते. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे १.१५ व ०.७९ टक्क्य़ांनी घसरले.

रेल्वे अर्थसंकल्प : लक्षणीय समभाग
२०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर होणार असल्याने या क्षेत्राशी संबंधित समभागांची हालचाल बुधवारी संमिश्र राहिली. गुरुवारी प्रत्यक्ष रेल्वे अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी मात्र या समभागांचा मूल्यप्रवास पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कालिंदी रेल निर्माण इंजिनीअर्स, सिमेन्स लिमिटेड, संघवी मूव्हर्स, टिटागड व्हॅगन्स, टेक्समॅको रेल अ‍ॅन्ड इंजिनीअरिंग, अ‍ॅलस्टोम टी अ‍ॅन्ड डी, हिंद रिफायनरीज, स्टोन इंडिया, कर्नेक्स मायक्रोसिस्टिम्स आदी समभागांवर रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींचा कसा परिणाम होतो ते गुरुवारी दिसेल.