मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ३२,००० हा भावनिकदृष्टय़ा आणखी महत्त्वाचा टप्पा गुरुवारी ओलांडला. तीन महिन्यांपेक्षा कमी काळात ३० ते ३२ हजार अशी तब्बल सहा टक्क्यांची निर्देशांकाने मुसंडी मारली आहे. तरीही बाजाराचे सद्य मूूल्यांकन बिलकूल महागडे नसल्याचे असे मत प्रिन्सिपल पीएनबी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रजत जैन यांनी ‘लोकसत्ता’बरोबरच्या संवादात व्यक्त केले.  अनेकांगाने अनुकूल अर्थसंकेत आणि अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत वाढीच्या सर्वाधिक शक्यता पाहता, भारताच्या भांडवली बाजाराचे अधिमूल्यासह मूल्यांकन होणे अपेक्षित आहे, असेही जैन यांनी स्पष्ट केले.

या बातचीतीचे हे संक्षिप्त रूप. 

  • सध्याचा एकंदर आशावादी सूर पाहता, भांडवली बाजाराचा आगामी रोख कसा असेल?

– आगामी दोन-तीन वर्षांसाठी बाजाराबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मकच आहे. एकंदर अर्थव्यवस्था मजबुतीकडे कूच करीत आहे. वित्तीय तूट आणि चालू खात्यावरील तूट आटोक्यात आली आहे. खनिज तेलाच्या किमतींवर आपले नियंत्रण नसले तरी त्यांची पातळी सलगपणे आपल्याला अनुकूल राहिली आहे. चलनाचे मूल्य स्थिर आणि त्या आघाडीवर धास्ती करण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. ज्या प्रमाणात विदेशातून भांडवलाचा ओघ सुरू आहे त्याचा हा सुपरिणाम आहे. केवळ बँकांची प्रचंड बुडीत कर्जे ही समस्या आहे. मुख्यत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवलाची चणचण भासणे हीदेखील एक समस्याच आहे. या समस्येच्या भडक्यामागे अर्थव्यवस्थेतील गत काळातील मरगळ होती हेही लक्षात घ्यायला हवे. तथापि येत्या काळात या समस्येच्या सोडवणुकीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एकंदर परिस्थितीत आणखी बिघाड होणार नाही तर ती सुधारतच जाईल असे यासंबंधाने म्हणता येईल. जगात अन्यत्र प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये उभारी दिसून येत आहे. त्यातून भारताच्या निर्यातीतही मोठी वाढ सुरू आहे. एप्रिलमध्ये ही वाढ आधीच्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्के अधिक होती. हे सर्व घटक पाहता आपल्या बाजारातील सकारात्मकतेला खंड पडेल अशी स्थिती नाही.

  • बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कसा राहील?

– यंदा चांगला पाऊसपाणी होणे हेही अर्थव्यवस्थेसाठी उपकारक ठरेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यातून बळ मिळेल आणि त्या ठिकाणाहून ग्राहक मागणी वाढेल. आपल्या अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वलतेसंबंधी जनसामान्यांच्या या वाढत्या आस्थेतून त्यांचा भांडवली बाजारातील गुंतवणूक ओघही लक्षणीय वाढल्याचे आपल्याला दिसते. हीच आस्था विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अधिक दृढ स्वरूपात दिसून येत आहे. अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताचे पारडे त्यांच्यालेखी कायम जड राहिले आहे.

  • बाजाराचे सध्याच्या मूल्यांकनाबद्दल आपले मत काय?

– सध्याच्या बाजारात खरेदीसाठी स्वस्त असे काही राहिलेले नाही हे खरे. अशा स्थितीत आम्हा निधी व्यवस्थापकांना अतिशय चोखंदळपणे आणि गुणात्मक विश्लेषणाअंती समभागांची निवड करावी लागत आहे. तथापि बाजार स्वस्त राहिला नसला तरी तो महागला म्हणायचे तर तेही तितकेसे खरे नाही. देशांतर्गत अर्थसंकेत आणि वाढीच्या शक्यता पाहता, उदयोन्मुख देशांच्या तुलनेत आपल्या बाजाराचे अधिमूल्यासह मूल्यांकन व्हायला हवे आणि तसे ते विदेशी गुंतवणूकदारांकडून केलेही जात आहे. अल्पकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणुकीचे धरसोड धोरण अनुसरल्यास सध्याच्या बाजारात प्रचंड जोखीम आहे. त्या उलट दोन ते तीन वर्षे अथवा अधिक मोठय़ा कालावधीचा दृष्टिकोन ठेवल्यास आजही गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

  • कोणत्या उद्योग क्षेत्रांबाबत आपण सकारात्मक आहात?

– भारताच्या अर्थव्यवसेत्या वाढीचा दर येत्या काळात जगात सर्वश्रेष्ठ राहील अशी आमची ठाम धारणा आहे. आपला अर्थव्यवस्थेचा तोल देशांतर्गत मागणीवर आधारलेला असल्याने, या क्षेत्रात उत्पादने व सेवा देणारे उद्योग सर्वात मोठे लाभार्थी ठरतील. सिमेंट, वाहन उद्योग, बँका, वित्तीय सेवा क्षेत्रांवर आमचा भर राहील.