देशातील सर्वात मोठे सुवर्ण आभूषणे निर्यातदार असलेल्या राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेडने जगातील सर्वात मोठा सोने शुद्धीकरण (रिफायनरी) सुविधा असलेल्या व्हाल्कम्बी या स्विस कंपनीवर ताबा मिळविल्याची सोमवारी घोषणा केली. सुमारे २,५६० कोटी रुपयांच्या (४० कोटी अमेरिकी डॉलर) मोबदल्यात झालेल्या या ताबा व्यवहाराने राजेश एक्स्पोर्ट्सला आवश्यक कच्चा माल तुलनेने स्वस्त मिळविता येईल.
राजेश एक्स्पोर्ट्सकडे सध्या भारतात असलेल्या सोने शुद्धीकरण क्षमतेत वाढ आणि तंत्रज्ञानात्मक सुधार व्हाल्कम्बीवर ताबा व्यवहाराने साधता येईल, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी व्यक्त केला. सध्या प्रति वर्ष ८० टन असलेली कंपनीची देशांतर्गत सोने शुद्धीकरण क्षमता चालू वर्षांत २०० टनांवर जाणे अपेक्षित आहे. शिवाय व्हाल्कम्बीमुळे कंपनीची कच्चा माल म्हणून सोन्याची आयात संपूर्णपणे आणि पूर्वीपेक्षा कमी खर्चात भागविली जाईल, असे मेहता यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर जगातील चीननंतर दुसरा मोठा ग्राहक देश असलेल्या भारतात दरसाल होणाऱ्या सरासरी ९०० टन आयातीपेक्षा जवळपास दुप्पट इतकी व्हाल्कम्बीची शुद्धीकरण क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

सोन्यात उतार सुरूच
मुंबई: मौल्यवान धातूला लागलेली घरघर मंगळवारी सराफ बाजारात झालेल्या व्यवहारातही दिसून आली. स्टँडर्ड सोन्याचा घाऊक भाव मंगळवारच्या व्यवहारात प्रति १० ग्रॅम १४५ रुपयांनी उतरून २४,७८० रुपयांवर स्थिरावला. शुद्ध सोनेही २५ हजारांखाली २४,९३० रुपयांवर आले. तर शुद्ध चांदी किलोमागे १८० रुपयांनी घसरणीसह ३४,२९० रुपयांनी व्यवहार झाले.