पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाच्या (ईपीसीए) निर्देशांचे पालन करीत आपल्या सर्व दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे जानेवारी २०१७  ‘बीएस-४’ नियमांचे काटेकोर पालन करीत उत्पादन सुरू केले असल्याचे बजाज ऑटोने बुधवारी येथे स्पष्ट केले. शिवाय १ एप्रिल २०१७ पासून ‘बीएस-४’ मानदंडापूर्वीच्या कोणत्याही वाहनाची विक्री किंवा नोंदणी न करण्याचाही आपला निर्णय कंपनीने जाहीर केला.

बजाज ऑटो ही मुदतीच्या आधी बीएस-४ मानदंडांचे पालन करणारी पहिलीच कंपनी बनली असून, बुधवारच्या तशी एकतर्फी घोषणा करून कंपनीने बीएस-३ नियमांनुसार उत्पादित वाहनांना अभय अथवा मुदतवाढ देण्याचे टाळावे असा सरकारला संदेश देण्यासह, मुदतवाढीची मागणी करणाऱ्या वाहन उत्पादकांवर शरसंधान साधले आहे.

प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १ एप्रिल २०१७ पासून वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषण उत्सर्जन मात्रेबाबत भारतीय मानदंड ‘भारत स्टेज तीन अर्थात बीएस-३’पासून एक पायरी वर चढून बीएस-४ मानदंडावर आधारित वाहनांनाच विक्रीची परवानगी दिली आहे.

त्यामुळे या तारखेपासून बीएस-३चे पालन करणाऱ्या कोणत्याही वाहनाची विक्री अथवा नोंदणी करता येणार नाही. परंतु, काही वाहन उत्पादकांची या मुदतीत वाढ करून देण्याची मागणी सुरू असताना, बजाज ऑटोने आपणहून या नियम पालनासाठी सज्जता पूर्ण केली असल्याची घोषणा करून अन्य कंपन्यांची कोंडी केली आहे.

बजाज ऑटो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज या प्रसंगी पत्रकारांपुढे बोलताना म्हणाले, एक जबाबदार उद्योगसमूह म्हणून बजाज ऑटोने अगोदरच या निर्देशांचे पालन सुरू केले आहे आणि ऑक्टोबर २०१६ पासून बीएस-४ मानदंडानुरूप वाहनांचे उत्पादन करायला सुरवात केली आहे. ते म्हणाले, ‘‘जानेवारी २०१७ पासून आमच्या तीनही प्रकल्पातून उत्पादित होणारी सर्व उत्पादने बीएस-४ नियमांचे पालन करणारी असतील.

शिवाय १ एप्रिल २०१७ पासून नोंदणीसाठी जाणारी सर्व वाहने बीएस-४ नियमांचे पालन करणारी असतील. अचूक पूर्वनियोजनामुळे आणि बीएस-४ चे पालन करणाऱ्या वाहनांच्या उत्पादनाला वेळेत सुरवात केल्यामुळे हे कंपनीला साध्य झाले आहे.’’

पवन ऊर्जेचा वापर करण्यापासून ते व्यावसायिक वाहनांसाठी सीएनजी आणि एलपीजी सारख्या पर्यायी इंधनांचा वापर, आपल्या उत्पादन प्रकल्पात हरित लागवड आणि जलप्रक्रिया प्रकल्प आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी डीटीएससारख्या आधुनिक इंजिन तंत्रज्ञानाचा वापर, अशा विविध उपायांद्वारे बजाज ऑटो हरित आणि स्वच्छ पर्यावरणासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे, असाही त्यांनी दावा केला.

बीएस-४ नियमांच्या पालनासाठी उत्सर्जनावर नियंत्रण आणताना कंपनीला मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जर आता या नियमपालनाला मुदतवाढ देण्यात आली तर ज्यांनी वेळेत बदल केलेला नाही ते कमी किमतीत उत्पादने विकून व्यावसायिकदृष्टय़ा फायदा मिळवू शकतील. त्यामुळे ज्या उत्पादकांनी निर्देशांचे वेळेत आणि काटेकोरपणे पालन केले आहे त्यांना नकळतपणे दंड बसणार आहे. त्यामुळे नियम न पाळणाऱ्या उत्पादकांना कोणत्याही अभय दिला जाऊ नये.  – राजीव बजाज, व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो लिमिटेड