इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी एमडी रंगनाथ यांच्या राजीनाम्यामुळे कंपनीचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे असे इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी म्हटले आहे. रंगनाथ हे भारतातील उत्तम वित्तीय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. अशा व्यक्ति दुर्मिळ असतात. भागधारक, ग्राहक, कर्मचाऱ्यांची आकांक्षा, फायनान्स, गुंतवणूक, सुशासन आणि कायदा याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. नैतिकदृष्टीकोनातून व्यवसाय केल्यास चांगला समाज कसा उभा राहतो हे त्यांना ठाऊक होते असे नारायण मुर्ती यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कठिण काळात ते जात असल्याने कंपनीचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे असे नारायण मुर्ती यांनी म्हटले आहे. इन्फोसिसने शनिवारी सकाळी रंगनाथ यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. इन्फोसिस ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे. मागच्या १८ वर्षांपासून रंगनाथ इन्फोसिसमध्ये आहेत.

राजीव बन्सल यांनी कंपनी सोडल्यानंतर २०१५ साली त्यांनी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जबाबदारी संभाळली होती. १६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत रंगनाथ मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम संभाळतील असे इन्फोसिसकडून सांगण्यात आले आहे.