19 November 2017

News Flash

योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी न पोहोचताच गिळंकृत होणे हे व्यवस्थेपुढील आव्हान कायम

रतन टाटा यांची खंत

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 8, 2017 2:16 AM

रतन टाटा

रतन टाटा यांची खंत

कुपोषणाच्या समस्येत अर्भकांच्या कुपोषणाची समस्या अत्यंत गंभीर आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकार कोटय़वधी रुपये खर्च करत आहे, त्यामुळे निधीअभावी कुपोषणाचा प्रश्न सुटत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र उपलब्ध निधी योग्य व्यक्तीपर्यंत न पोहोचणे अथवा आधीच गिळंकृत केला जाणे, हे खरे व्यवस्थेसमोरील आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ उद्योगपती व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. टाटा समूहाच्या ‘टाटा रिव्ह्य़ू’ या नियतकालिकाच्या माध्यमातून टाटा ट्रस्टच्या कामाचा लेखाजोखा टाटा यांनी मांडला आहे.

बदलत्या काळानुसार टाटा ट्रस्टच्या कामाचे स्वरूपही बदलते आहे, मात्र ट्रस्टचे ध्येय मात्र बदललेले नाही. कुपोषण, पाणी, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, शहरी गरिबी, इंधन आदी गोष्टींशी निगडित समस्यांच्या निराकरणासाठी ट्रस्ट आजही कटिबद्ध आहे आणि याचसाठी सदैव कार्यरत असल्याचे टाटा यांनी सांगितले.

या वेळी टाटा यांनी विविध राज्यांतील सरकारांसोबत जवळून काम करण्याच्या मुद्दय़ावरही भर दिला. प्रशासन आणि तंत्रज्ञान जर आपल्यासोबत असेल, तर कोणतेही काम सहजगत्या पूर्ण करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाचेक दशकांपर्यंत अशक्य वाटत असलेली कामे आज तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने सहज पूर्ण करता येतात, असेही ते म्हणाले.

यात राज्यांमधील सरकारांचे योगदान व पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करून ते म्हणाले की, सरकारसोबत प्रशासन, त्यांच्या सोयीसुविधा, दूरगामी क्षेत्रात त्यांची पोहोच, याचे पाठबळ योजनांना मिळते. आम्ही ज्या ज्या राज्यांसोबत काम करतो, तेथील मुख्यमंत्र्यांना या योजना व प्रकल्प यशस्वी व्हावेत, असे प्रकर्षांने वाटत असते. सुरुवातीच्या काळात सरकारांसोबत काम करणे उभय बाजूंना आव्हानात्मक वाटत असे. आता मात्र उभय बाजू एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कामाला लागत असल्याचेही टाटा यांनी सांगितले.

आम्ही नेहमीच सहविचारी भागीदारांचे स्वागतच केले आहे आणि नेहमीच त्यांच्या हातात हात घालून काम केले आहे. अशा भागीदार संस्थांचे आम्ही भविष्यातही स्वागतच करू. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनपासून ते जागतिक बँकेपर्यंत अनेक संस्था-संघटनांसोबत टाटा ट्रस्टची भागीदारी असल्याकडेही टाटा यांनी लक्ष वेधले.

या प्रक्रियेमध्ये आपण स्वत:ला जितके जास्त झोकून देऊ, तितकेच या निधीच्या योग्य विनियोगाची कल्पना आपल्याला येत जाईल, असे मत टाटा मांडले आहे. अर्भक कुपोषणापासून झालेली प्रक्रिया साहजिकच मातांच्या आरोग्यापर्यंत आणि ती केवळ आरोग्यसेवेपुरतीच मर्यादित न राहता आता ती पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, शिक्षण आदी क्षेत्रांपर्यंत विस्तारली आहे.

 

First Published on September 8, 2017 2:15 am

Web Title: ratan tata comment on stock exchange of india