टाटा समूहातील सायरस मिस्त्री यांचे शेवटचे अस्तित्वही नाहीसे करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसण्यात आली आहे. टाटा सन्सचे संचालक म्हणून मिस्त्री यांना दूर करण्यासाठी कंपनीने येत्या ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे.

१०३ अब्ज डॉलर समूहातील विविध १०० हून कंपन्यांची मुख्य प्रवर्तक असलेल्या टाटा सन्सवरील मिस्त्री यांना हटविण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची सहमती आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात होणाऱ्या सभेत सादर केला जाऊन त्यावर मत घेण्यात येईल.

टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर रोजीच दूर करण्यात आले आहे. त्यानंतर विविध आठ कंपन्यांवरील त्यांचे अध्यक्षपद हिरावून घेण्यासाठी समूहाने विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. पैकी तीन कंपन्यांमध्ये यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर मिस्त्री यांनी उर्वरित सर्व कंपन्यांच्या अध्यक्ष तसेच संचालकपदाचे १९ डिसेंबर रोजी राजीनामे दिले होते. यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात गेले.

मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतरही ते कंपनीचे संचालक म्हणून कायम आहेत. समूह आणि तिचे संचालक यांच्याविरुद्ध मिस्त्री यांचे दोषारोप सुरूच असून ते संचालक म्हणून टाटा सन्सवर राहणे योग्य नाही, असे कंपनीने भागधारकांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मिस्त्री यांनी गैररीत्या समूह तसेच कंपन्यांची गोपनीय कागदपत्रे अध्यक्षपदानंतरही आपल्याजवळ बाळगली, असा आक्षेप टाटा सन्सने घेतला आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात सायरस मिस्त्री यांना संचालक म्हणून टाटा इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) आणि टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस या तीन कंपन्यांवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतरच्या आठवडय़ात टाटा समूहातील पाच कंपन्यांची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र मिस्त्री यांनी तत्पूर्वीच अन्य कंपन्यांच्या संचालकपदाचे राजीनामे देऊन टाकले.

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात टाटा – मिस्त्री वादावर येत्या ३१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. लवादाकडे समूहाविरुद्ध तक्रार करताना मिस्त्री यांनी टाटा सन्समध्ये कंपनी सुशासनाचे पालन होत नसल्याचा आक्षेप नोंदविला आहे. यासाठी पुरावे देण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत.