News Flash

व्यवसायावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका!

आपण सर्व मिळून टाटा समूहाला पुन्हा भक्कम बनवू, असे आवाहन केले.

छाया : गणेश शिर्सेकर

रतन टाटा यांचे समूहातील कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांना आवाहन

सायरस मिस्त्री यांची सोमवारी हकालपट्टी केल्यानंतर रतन टाटा यांनी दुसऱ्याच दिवशी समूहातील कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून गेल्या दोन दिवसांतील घडामोडींचा नित्य व्यवसायावर कोणताही परिणाम  होणार नाही, याची दखल घेण्याचे आवाहन केले.

टाटा उद्योग समूहातील विविध कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सुचविले आहे. समूहाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आपण हंगामी अध्यक्षपद अत्यंत अल्पावधीसाठी स्वीकारले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. समूहाला एकदा का कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाला की मी बाजूला होईन, असे रतन टाटा यांनी ‘बॉम्बे हाऊस’ या मुख्यालयात मंगळवारी उपस्थिती लावताना, तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. समूहातील कंपन्यांनी त्यांच्या बाजारातील सद्य:स्थितीच्या आधारानुसार लक्ष केंद्रित करावे; कंपन्यांचा भूतकाळातील प्रवास अथवा आपल्या कारकिर्दीतील प्रवास याच्याशी तुलना करू नये, असेही त्यांनी या वेळी बजाविले. सायरस मिस्त्री यांचा उल्लेख न करता यापूर्वी घेतलेल्या निर्णयांमध्ये आवश्यकता भासल्यास चर्चा करून बदल करण्याची तयारीही टाटा यांनी दाखविली. यापूर्वी आपण जसे एकत्र काम केले तसेच कार्य समूहाकरिता यापुढेही करीत राहू, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना आश्वस्त केले. आपण सर्व मिळून टाटा समूहाला पुन्हा भक्कम बनवू, असे आवाहन केले.

चंद्रशेखरन, स्पेथ टाटा सन्सवर

ल्ल टाटा सन्सच्या संचालक मंडळावर समूहातील टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन व जग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉल्फ स्पेथ यांना मंगळवारी उशिरा अतिरिक्त संचालक म्हणून सामावून घेण्यात आले.

गच्छंतीचे मताधिक्य

ल्ल सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून बाजूला करण्याबाबत सोमवारी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळ बैठकीत सहा सदस्यांनी होकार दर्शविला होता. संचालक मंडळावर खुद्द रतन टाटा तसेच सायरस मिस्त्री यांच्यासह नऊ सदस्य आहेत. पैकी सहा सदस्य मिस्त्री यांच्या गच्छंतीच्या बाजूने, तर दोन सदस्य तटस्थ, तर प्रस्तावाविरोधात खुद्द मिस्त्री यांचेच एकमेव मत पडले.

भाषण गायब

ल्ल मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून गच्छंती होताच टाटा समूहाच्या संकेतस्थळावरून त्यांचे अध्यक्षीय भाषण काढण्यात आले. मिस्त्री यांनी डिसेंबर २०१२ मध्ये अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेताच प्रसृत केलेले भाषण, महिन्याच्या सुरुवातीला ‘टाटा डॉट कॉम’ला दिलेली मुलाखतही काढून टाकण्यात आली आहे.

टाटा कार्यालयात

मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून गच्छंती झाल्यानंतर टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी मंगळवारी सकाळीच समूहाच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयात हजेरी लावली. रतन टाटा हे आधी जवळच्याच टाटा सन्सच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ते समूहाच्या  ‘बॉम्बे हाऊस’मध्ये पायीच चालत आले. येथे ते दिवसभर उपस्थित होते. या दरम्यान त्यांनी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुपारी १ पर्यंतच्या कार्यालयातील उपस्थिती दरम्यान त्यांनी प्रामुख्याने समूहातील काही कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:22 am

Web Title: ratan tata cyrus mistry issue
Next Stories
1 बाजारावर दबाव; निर्देशांकात घसरण
2 अनेक उद्योग क्षेत्रांसाठी भरभराटीची यंदाची दिवाळी
3 विदेशातील मालमत्ता तपशिलासाठी मल्यांना महिन्याभराची मुदत
Just Now!
X