News Flash

‘टाटा ट्रस्टचे तुम्हीच खरे वारसदार व रक्षकही’

रतन टाटा यांचे कर्मचाऱ्यांना उद्देशून भावोत्कट पत्र

टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी शुक्रवारी जमशेदपूर येथे समूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या १७८व्या जयंतीनिमित्ताने आदरांजली वाहिली. नवनियुक्त अध्यक्ष एन. चंद्रशेखरन हेही या वेळी उपस्थित होते. २०१७ हे टाटा ट्रस्टच्या स्थापनेचे १२५वे वर्ष म्हणून साजरे होत आहे.

रतन टाटा यांचे कर्मचाऱ्यांना उद्देशून भावोत्कट पत्र

शाश्वत बदलांमध्ये विश्वास राखणारे तुम्हीच टाटा ट्रस्टचे खरे वारसदार आणि रक्षकही आहात, अशी भावना टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी समूहातील कर्मचाऱ्यांजवळ पत्र लिहून व्यक्त केली आहे.

टाटा सन्सचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी टाटा यांची १७८वी जयंती व टाटा ट्रस्टच्या १२५व्या वर्षांनिमित्ताने समूहातील कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राबरोबरच टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी जमशेदपूर येथील कार्यक्रमात नवनियुक्त अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला.

पत्रात टाटा म्हणाले की, ‘समूहातील लाखो कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने टाटा सन्सचे वारसदार आहेत. तुम्हीच त्याचे रक्षक आहात. तुमच्या कठोर परिश्रमाबद्दल मी तुमचे आभार मानतो.’

‘तुमची उमेद, जोम, प्रामाणिकपणा यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे,’असा उल्लेख करत टाटा यांनी देश आणि समूहासाठी कार्य करण्याची अनोखी संधी यानिमित्ताने तुम्हाला मिळत आहे, असे स्पष्ट केले.

समूहाचे कर्मचारी आणि भागधारक यांच्याप्रति रतन टाटा यांचे नेहमीच झुकते माप राहिले आहे. सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर टाटा यांनी कर्मचारी तसेच भागधारकांना वेळोवेळी पत्र लिहिले होते.

टाटा सन्सचे नवे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे कौतुक करताना टाटा यांनी, चंद्रा हे समूहाला एका नव्या वळणावर घेऊन जातील, असे म्हटले. समूह आणि हे शहर (जमशेदपूर) आता चंद्रासारख्या व्यक्तीच्या हाती सुरक्षित आहे, असेही नमूद केले. चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस) प्रगतिपथावर पोहोचली. तेव्हा अशीच प्रगती समूहालादेखील त्यांच्यामुळे गाठता येईल, असेही टाटा यांनी म्हटले आहे. ‘जमशेदपूरच्या स्टील सिटीमध्ये मी गेल्या ३६ तासांपासून आहे आणि या दरम्यान मी मानवी जीवनावरील या शहराचा परिणामही अनुभवत आहे,’ असे एन. चंद्रशेखरन यांनी जमशेदपूर प्रकल्पस्थळी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांसमोर मत व्यक्त केले.

टाटा सन्समध्ये प्रमुख विश्वस्त टाटा ट्रस्टचा सर्वाधिक, ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्सही विविध १००हून अधिक कंपन्यांची प्रवर्तक आहे. १४८ वर्षे जुना टाटा समूह आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:05 am

Web Title: ratan tata tata trusts
Next Stories
1 दर महिन्याच्या ५ तारखेला ‘म्युच्युअल फंड दिन’
2 बीएएसएफद्वारे मुंबईत आशियातील सर्वात मोठे नाविन्यता केंद्र
3 सेवा क्षेत्र पूर्वपदावर!
Just Now!
X