भांडवली बाजारात तेजीची पुन्हा एकदा झुळूक निर्माण करत प्रमुख निर्देशांकांनी नव्या महिन्यातील वायदापूर्तीचा पहिलाच दिवस वाढीने नोंदविला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सप्ताहअखेरच्या व्यवहारात त्रिशतकी झेप नोंदवीत २७,८०० पुढे गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही शतकी अंश वाढीने ८,४०० पुढील प्रवास करणे सुलभ झाले.
३२१.७३ अंश वाढीने सेन्सेक्स २७,८२८ वर तर निफ्टी ११४.६५ अंश वाढीमुळे ८,४३३.६५ पर्यंत गेला. भांडवली बाजाराची शुक्रवारची झेप ही १८ मेनंतरची सर्वात मोठी ठरली. २७,५५३ या तेजीसह सुरू झालेला सप्ताहअखेरचा प्रवास २७,८८८.३२ पर्यंत गेला होता.
येत्या आठवडय़ातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणातील संभाव्य व्याजदर वाढीच्या आशेवर बाजारात अनेक सत्रानंतर पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले. त्याचबरोबर शुक्रवारी सायंकाळी उशिरा होणाऱ्या गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या जोरावरही बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचे व्यवहार होत होते.
सेन्सेक्समधील महिंद्र, एअरटेल, गेल, मारुती सुझुकी, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, हिरो मोटोकॉर्प, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, विप्रो, एनटीपीसीचे समभाग मागणीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वाधिक २ टक्क्यांनी वाढला. पाठोपाठ आरोग्य निगा, बँक, तेल व वायू आदी निर्देशांक राहिले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने शुक्रवारी गेल्या चार व्यवहारातील घसरण मोडून काढताना निर्देशांकात शतकी भर नोंदविली. यामुळे निफ्टी पुन्हा ८,४०० पुढे वाटचाल करता झाला. निफ्टीत वाहन, औषधनिर्माण, बँक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. त्यातही भारती एअरटेल, ल्युपिन, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, भारत पेट्रोलियम, ग्रासीमसारखे समभागांचे मूल्य उंचावले.
‘एसएससीआय’चे दमदार पदार्पण
मुंबई शेअर बाजारात शुक्रवारपासून सुरू झालेल्या एमएससीआय इंडिया निर्देशांकाने पहिल्याच दिवशी ८ टक्क्यांची झेप नोंदविली. यामध्ये सहभागी भारती इन्फ्राटेल, मॅरिको, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यूपीएल, ल्युपिन, आयशर मोटर्स, भारत फोर्ज, श्री सिमेंट व रिलायन्स इन्फ्रा कंपन्यांचे समभाग मूल्य ८.१५ ते १.७६ पर्यंत वाढले. एमएससीआय निर्देशांक आंतरराष्ट्रीय बाजारात बाजार विश्लेषकांच्या लेखी महत्त्वपूर्ण म्हणून नोंदला जातो. मुंबई शेअर बाजारातील या निर्देशांकांत उपरोक्त कंपन्यांबरोबरीने आघाडीच्या इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स, सन फार्मा, आयटीसीसह ६४ समभाग आहेत.