२.६३ लाखांवरून, २०१८ मध्ये २.५६ लाखांवर

मुंबई : गरीब-श्रीमंतांतील दरी वाढत असल्याचा मुद्दा पटलावर असताना, उच्च धनसंपदा असलेल्या व्यक्तींच्या संपत्तीत वाढीच्या दरालाही उतरती कळा लागली असल्याचे एका पाहणी अहवालाचे निरीक्षण पुढे आले आहे. २०१८ सालात धनाढय़ांच्या संपत्तीत वाढीचा टक्का ९.६२ वर उतरला आहे. २०१७ सालात हा वाढीचा दर १३.४५ टक्के होता, असे काव्‍‌र्ही वेल्थ मॅनेजमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने स्पष्ट केले आहे.

उत्पन्नातून खर्च वजा करता १० लाख अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूकयोग्य वरकड असणारे अशी उच्च धनसंपदेच्या व्यक्तींची व्याख्या केली गेली आहे. त्यांची देशातील एकूण संख्याही २०१७ मधील २.६३ लाखांवरून, २०१८ मध्ये दोन लाख ५६ हजारांवर घसरली असल्याचे हा संपत्तीविषयक अहवाल सांगतो. या २.६३ धनाढय़ांची मिळून एकत्रित संपत्ती मात्र २०१८ मध्ये ४३० लाख कोटी रुपये झाली आहे, जी २०१७ सालात ३९२ लाख कोटी रुपये होती.

या अहवालाच्या निष्कर्षांनी भारतातील असमानतेलाच पटलावर आणले असून, ही असमानता गरिबांना अधिक गरीब करणारी आणि श्रीमंतांना वेगाने आणखी गब्बर करणारी आहे. धनाढय़ांनी धारण केलेल्या २६२ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीत सर्वाधिक वाटा हा वित्तीय मालमत्तांचा असून, ६०:४० या प्रमाणात उर्वरित संपत्ती ही भौतिक मालमत्तांमध्ये विसावली असल्याचे अहवाल सांगतो.

वित्तीय मालमत्तांमध्ये थेट समभाग गुंतवणूक ही ५२ लाख कोटींची आहे. मात्र या गुंतवणुकीतील वाढीचा दर २०१८ सालात ६.३९ टक्के असा कमालीचा घसरला आहे. २०१७ सालात त्याचा वृद्धीदर ३०.३२ टक्के असा उच्चांकी होता. त्या उलट निश्चित लाभ मालमत्तांमध्ये (मुदत ठेवी, रोख्यांमध्ये) गुंतवणुकीतील वाढीचा दर २०१७ मधील ४.८६ टक्क्यांवरून, ६.३९ टक्के असा वाढला आहे.

विमा हा धनाढय़ांच्या मालमत्तेत तिसरा मोठा घटक असून, त्यात २०१८ साली त्यांचे ३६ लाख कोटी गुंतले आहेत. तर बँकांतील ठेवींमध्ये ३४ लाख कोटी रुपये आहेत.

सोन्याबद्दल सर्वाधिक आसक्ती..

धोरणकर्त्यांचा भारतीयांचे सोन्याबद्दलचे आकर्षण कमी करण्याकडे कल असला तरी त्या विपरीत सोन्यात सर्वाधिक ८० लाख कोटी रुपये धनाढय़ांचे गुंतले आहेत. अन्य भौतिक मालमत्तांमध्ये त्यांनी ७४ लाख कोटी रुपये इतकी स्थावर मालमत्ता धारण केलेली आहे. काव्‍‌र्हीच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत धनाढय़ांची व्यक्तिगत संपत्ती ही वार्षिक सरासरी १३.१९ टक्के वाढत जाईल आणि ती ७९८ लाख कोटी रुपयांची पातळी गाठेल.