गव्हर्नर म्हणून कारकिर्दीतील शेवटचे पतधोरण जाहीर करणाऱ्या डी. सुब्बराव यांनी केवळ महागाईवर लक्ष केंद्रित न करता विकासाला प्राधान्य द्यावे, असा अनाहूत सल्ला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिला आहे. मध्यवर्ती बँकेने व्यापारी बँकांसाठीचे कर्ज महाग केले असले तरी या बँकांना निधीची तूर्त कोणतीही अडचण नसून त्यांच्यामार्फत कर्जदारांवर वाढीव व्याजदर लादले जाणार नाहीत, याचीही अर्थमंत्र्यांनी ग्वाही दिली.
सुब्बराव यांनी वेळोवेळी महागाईबद्दल, चालू खात्यातील तुटीबद्दल चिंता व्यक्त करत व्याजदर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. तर आता त्यांच्यासमोर डॉलरच्या तुलनेत ढासळत्या रुपयाचे आव्हान आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी जुलै महिन्यात दोन वेळा कठोर उपाययोजना झाल्या आहेत. गेल्या आठवडय़ात चलन स्थिरावण्याचा इच्छित परिणामही दिसला आहे. केवळ महागाईवर लक्ष केंद्रित न करता अर्थव्यवस्थेची वाढ, अधिकाधिक रोजगारनिर्मिती याबाबी पतधोरण निश्चित करताना रिझव्‍‌र्ह बँकेने दुर्लक्षित करू नयेत, असे अर्थमंत्र्यांनी सुचविले आहे. या विषयावर गव्हर्नरांचे उद्याचे पतधोरणच अधिक प्रकाश टाकेल, असेही ते म्हणाले. गव्हर्नर सुब्बराव यांनी गेल्याच आठवडय़ात अर्थमंत्र्यांची राजधानीत भेट घेतली होती.