जूनच्या प्रारंभी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणापलीकडे बाजाराला गती देईल असा दुसरा कोणता ‘ट्रिगर’ नसल्याचे याच सदरात मागे म्हटले होते. रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दर कपात बाजाराने गृहीत धरली होती. अपेक्षेइतकी कपातही झाली. पण त्यापेक्षा गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था, चलनवाढ याबाबत वर्तमान व नजीकच्या भविष्यासंबंधी केलेल्या चिंतायुक्त वक्तव्यांनी साधलेला नकारात्मक परिणाम e01बाजाराला अधिक भोवणारा ठरला. तुटीच्या पावसाच्या कयासातून, आधीच लांबलेल्या औद्योगिक व अर्थव्यवस्थेच्या उभारीने वेग पकडणे आणखी काही काळ लांबणीवर जाणे अटळ दिसून येत आहे. सध्याच्या बाजारातील पडझडीमागे हीच चिंता आहे.
सरलेल्या आठवडय़ात ‘सेन्सेक्स’ आठ महिन्यांपूर्वीच्या पातळीवर रोडावला आहे. त्याची सध्याची पातळी गेल्या वर्षी याच सुमारास असलेल्या स्तरापेक्षा केवळ ३.१ टक्के अधिक आहे. ‘निफ्टी’ने २०१५ सालात प्रथमच ८,००० पातळीखाली बुडी मारली आहे. पण बाजारातील या ताज्या पडझडीचा आवाका आणि परिणाम प्रत्यक्षात दिसतो त्यापेक्षा अनेकांना खूप अधिक बेचैन करणारा निश्चितच आहे.
सेन्सेक्स हा निर्देशांक निर्धारित करणाऱ्या ३० पैकी निम्मे समभाग त्यांच्या वार्षिक नीचांक पातळीच्या खाली गेले आहेत. टाटा स्टील, रिलायन्स, स्टेट बँक, आयटीसी, टाटा मोटर्स ही एरव्ही बाजारातील भारदस्त नावे, पण त्यांच्या समभागांचे भाव आज बहुवार्षिक नीचांक स्तरावर आहेत.
भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या पातळीबाबत अनेक तर्क-कयास वेगवेगळ्या स्तरावर आज पुन्हा रंगत आहेत. विकास दरासंबंधीचा रिझव्‍‌र्ह बँकेचा अंदाज खालावलाच आहे, त्याच वेळी अन्य प्रतिष्ठित संस्था व अर्थतज्ज्ञ त्यांच्या पूर्वघोषित अंदाजांवर मात्र ठाम आहेत. हे अंदाज म्हणजे केवळ आकडय़ांची अटकळबाजीच आहे काय? कारण कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदात त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसत नाही अथवा बँकांकडून कर्ज उचल वाढली आहे, असेही त्याचे प्रत्यंतर दिसून येत नाही. थोडक्यात, आता बाजाराचाही या आकडेबाजीवरील विश्वास उडत चालल्याचे दिसत आहे.
जमेची बाब हीच की, घसरणीचा हा फेरा हा केवळ भारताच्या भांडवली बाजारापुरता सीमित नाही. उभरत्या बाजारातील आपले स्पर्धक इंडोनेशिया, ब्राझील, रशिया यांची अवस्था आपल्यापेक्षा वाईट आहे. चीनच्या बाजारात सध्या दिसत असलेला बुडबुडा केव्हा फुस्स होईल याचा नेम नाही.
त्या मानाने आपल्या बाजाराचा फुगा नको तितका ताणला जाण्याआधीच सैलावला, हे योग्य म्हणायला हवे. म्हणूनच १२-१५ टक्क्यांच्या घसरणीचा हा फेरा बाजाराची दीर्घावधीत सुदृढ पायाभरणी करणारा ठरावा.

बाजारगप्पा :
आगामी पंधरवडा बाजारासाठी खालच्या दिशेने अनिश्चित हालचालीचा राहील. अमेरिकेतील रोजगाराचे ताजे आकडे पाहता, तेथील मध्यवर्ती बँकेकडून आगामी आठवडय़ात शक्य असलेल्या व्याजदर वाढीच्या निर्णयाकडे आपला गुंतवणूकदार मानेवर लटकलेल्या टांगत्या तलवारीसारखा पाहत आहे. या निर्णयाचा आपल्या बाजारावर कसा व किती परिणाम होईल, याचा नेमका अंदाज बांधणे त्याच्यासाठी अवघडच आहे. निफ्टीला ८,०००चा स्तर सांभाळता येणे कठीण आणि त्या खाली निफ्टीच्या तळाचा अंदाज लावणे त्याहून कठीण आहे.

शिफारस :
पावसाच्या आगमनाची आस आता शेतकऱ्यांइतकीच गुंतवणूकदारांनाही होती. मान्सून सुरू झाला खरा, पण त्याचा तीन महिन्यांतील प्रवास आजही अनिश्चित आहे. एकुणात आसमंतातील अनिश्चितेतचा धुरळा बसेपर्यंत खरेदीला आरामच दिलेला बरा. मोदी सरकारने साखर उद्योगाला तारणारे निर्णय घेतले आहेत. परिणामी दीर्घकाळ मंदीच्या गर्तेत सापडलेल्या या साखर समभागांतील ताजी उभारी आश्वासक आहे. ही गुंतवणूक मध्यमकाळात फायद्याची ठरावी. दीर्घ ते मध्यम कालावधीसाठी ‘आरईसी’चा समभागही आकर्षक वाटतो.