अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात करण्याची घोषणा मंगळवारी केली. यामुळे रेपो दर गेल्या चार वर्षातील सर्वांत कमी म्हणजे ६.७५ टक्के इतका झाला आहे. रेपो दरात अर्धा टक्क्याने कपात केल्यामुळे गृह आणि इतर कर्जांवरील व्याजदरातही बॅंकांना कपात करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. महागाईच्या वेढ्यात अडकलेल्या सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते.
रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठीच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. त्यांनी रोख राखीवता निधीत मात्र कोणतीही कपात केलेली नाही. रोख राखीवता निधी ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. जानेवारी २०१६ पर्यंत चलनवाढीचा दर ५.८ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यताही बॅंकेने वर्तविली आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षातील विकासदर ७.४ टक्के इतका राहिल, असाही अंदाज बॅंकेने वर्तविला. पुढील तिमाहीमध्ये त्यामध्ये वाढ होण्याचा अंदाजही बॅंकेने व्यक्त केला आहे.
किमान आधारदराबाबतची अंतिम मार्गदर्शक तत्त्वे रिझर्व्ह बॅंक नोव्हेंबर अखेरपर्यंत जाहीर करेल, असेही आज सांगण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१५ पासून प्रत्येकी पाव टक्क्याची तीनवेळा रेपोदारात कपात करूनही व्यापारी बँकांनी आपल्या कर्जाच्या संदर्भ दरात कपात न करता रिझव्‍‌र्ह बँकेच्या दरकपातीचा फायदा प्रत्यक्ष कर्जादारांपर्यंत पोहचविला नसल्याचा आक्षेप रिझव्‍‌र्ह बँकेने नोदाविला होता. त्या पार्श्वभूमीवर या मार्गदर्शक तत्त्वांना महत्त्व आहे. जानेवारी – जून दरम्यानच्या काळात पाउण टक्क्याची रेपो दरात कपात केल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले.