रिझव्‍‌र्ह बँकेकडून १ जूनपासून वेळेत वाढ

मुंबई : ग्राहकांना आता आंतरबँक निधी हस्तांतरणाची सर्वात गतिमान सुविधा असलेले ‘आरटीजीएस’ व्यवहार हे उशिरात उशिरा सायंकाळी ६ वाजेपर्यंत करणे शक्य होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने येत्या १ जून २०१९ पासून या व्यवहारांसाठी निर्दिष्ट वेळ ही सायंकाळी ४.३० ते ६.०० वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकांमध्ये आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम्स) अंतर्गत व्यवहाराच्या वेळा आता तीन वेळांमध्ये होतील. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत पहिली खिडकी, ११ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत दुसरी, तर १ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या व्यवहारांची तिसरी खिडकी असेल. पहिल्या खिडकी अर्थात वेळ मर्यादेत होणाऱ्या व्यवहारांसाठी निर्धारित प्रक्रिया शुल्काव्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क ग्राहकांना भरावे लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या दुपारी १ वाजल्यानंतर, दुसऱ्या व तिसऱ्या खिडकीमार्फत होणाऱ्या व्यवहारांसाठी ग्राहकांना अनुक्रमे २ रुपये आणि ५ रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

आरटीजीएसप्रमाणे ‘आयएमपीएस’ नावाची सुविधा बँकांकडून उपलब्ध आहे. परंतु या प्रकारच्या सेवेत फक्त दोन लाख रुपयांपर्यंतचा निधी एका खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. मात्र त्यापेक्षा अधिक मूल्याच्या रकमेच्या हस्तांतरणासाठी, म्हणजे २ लाख रुपयांपुढे १० लाख रुपये मर्यादेपर्यंत हस्तांतरण व्यवहार हे फक्त आरटीजीएस सुविधेद्वारेच केले जाऊ शकतात.