रिझर्व्ह बँकेने मंगळवारी एचडीएफसी बँकेला 1 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. फसवणुकीबाबत माहिती न दिल्याने आणि अन्य निर्देशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर ही कारवाई केली आहे. परकीय चलन पाठवण्यासाठी काही आयातदारांनी खोटी बिल जमा केल्याप्रकरणी हा रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला आहे.

आपल्या ग्राहकांना केवायसी प्रक्रिया, मनी लाँड्रिंग तसेच फसवणुकीची सुचना देण्याशी निगडीत नियमांचे बँकेने उल्लंघन केल्याचे तपासातून पुढे आल्याचे रिझर्व्ह बँकने आपल्या वेबसाईटवर नमूद केले आहे. तसेच यासंदर्भात बँकेला नोटीस जारी करण्यात आली असून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकांचे पालन का करण्यात आले नाही आणि बँकेवर का दंड ठोठावण्यात येऊ नये, असा सवालही रिझर्व्ह बँकेने केला आहे. दरम्यान, एचडीएफसी बँकेने दिलेल्या उत्तरानंतर रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी बँकेची अंतर्गत व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आल्याची माहिती एचडीएफसी बँकेकडून देण्यात आली.

गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार पाहता रिझर्व्ह बँकेने बँकांवर अंकुश ठेवण्यास सुरूवात केली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात बँकांशी निगडीत 71 हजार 500 कोटी रूपयांची 6 हजार 800 पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली होती. तर 2017-18 या आर्थिक वर्षात 41 हजार 167 कोटी रूपयांची 5 हजार 916 प्रकरणे समोर आली होती.