गव्हर्नर दास यांचे स्पष्ट संकेत

मुंबई : सहा वर्षांच्या तळात पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेला मरगळीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीचा आणखी एक निर्णय घेतला जाणार, असे दिसून येत आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी खुद्द तसे स्पष्ट संकेत गुरुवारी मुंबईत दिले. सध्याचा स्थिर महागाई दर पाहता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातला आणखी वाव असल्याचे ते म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची पाचवी द्विमासिक बैठक येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तीन दिवसांच्या बैठकीनंतर ४ ऑक्टोबर रोजी बैठकीतील व्याजदर बदलाबाबतचे निर्णय जाहीर केले जातील.

रिझव्‍‌र्ह बँकेने विद्यमान २०१९ सालात सलग चौथ्यांदा व्याजदर कपात करत आतापर्यंत एकूण १.१० टक्के इतकी रेपो दरात कपात केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचा सध्याचा रेपो दर ५.४० टक्के असा गेल्या नऊ वर्षांतील किमान स्तरावर आहे.

आर्थिक विकासासाठी सरकार स्तरावरील उपाययोजनांना मर्यादा असून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो, असेही दास म्हणाले. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तुटीचे प्रमाण ३.३ टक्के राखणे आव्हानात्मक असले तरी कर संकलनाला योग्य प्रतिसाद मिळाल्यास ते शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा, ४ टक्क्यांपेक्षा कमी असेल. सौदीतील तेल कंपनीवरील हल्ला, अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम अल्पकालीन असेल, असेही ते म्हणाले.