रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी डॉ. रघुराम राजन यांच्या मुदतवाढीच्या मुद्दय़ावर उलटसुलट टिकाटिप्पणी सुरू असतानाच, चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले खुद्द राजन यांनी मात्र सप्टेंबरनंतर आपल्याला या पदावर राहण्यात रस नसल्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मात्र हे वृत्त म्हणजे अटकळबाजी असल्याचे सांगत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत त्याचे खंडन केले आहे.
एका बंगाली नियतकालिकाने रिझव्‍‌र्ह बँकेतील सूत्राच्या हवाल्याने राजन यांचे दुसऱ्यांदा गव्हर्नरपद सांभाळण्याबद्दल नाखुषीचा कल स्पष्ट करण्यात आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेतील तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर ते अमेरिकेत शिकागो विद्यापीठातील अध्यापन कार्यात पुन्हा रूजू होण्यास इच्छुक असल्याचा हवालाही वृत्तात देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मात्र राजन यांना मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचे या वृत्तात दावा करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ तसेच विदेशात प्राध्यापकी केलेल्या राजन यांना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पुन्हा दोन वर्षांसाठी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र सत्ताधारी भाजपचे खासदार व ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यन स्वामी यांनी राजन हे शेतकरी, लघुउद्योगविरोधी तसेच अमेरिकाधार्जिणी धोरणे राबवित असल्याचे पंतप्रधानांना पत्र लिहित त्यांना तात्काळ पदमुक्त करून, अमेरिकेत पुन्हा रवानगी केली जावी असा आग्रह धरला आहे. गोदरेज समूहाचे अदी गोदरेजसह अनेक उद्योजकांनी राजन यांना मुदतवाढ देण्याबाबत समर्थन केले आहे.
राजन यांचा कार्यकाळ वाढविला न गेल्यास, १९९२ नंतर पाच वर्षांचा कार्यकाळ न मिळणारे ते पहिले गव्हर्नर ठरतील. १९९२ पासून रिझव्‍‌र्ह बँकेवरील चारही गव्हर्नरांचा कार्यकाळ हा प्रत्येकी पाच वर्षांचा राहिला आहे.

अद्याप काहीही निर्णय नाही – सरकार
ल्ल सप्टेंबरअखेर मुदत संपत असलेल्या गव्हर्नर राजन यांच्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसून त्यांचे भवितव्य योग्यवेळी ठरविले जाईल, असे अर्थ मंत्रालयातून स्पष्ट करण्यात आले. खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजन यांना मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत सरकारमध्ये तूर्त चर्चा नाही; याबाबत जो काही निर्णय सरकारला घ्यायचा आहे तो जेव्हा वेळ येईल तेव्हा सप्टेंबरनजीक घेतला जाईल. दरम्यान, राजन यांना मुदतवाढ देण्याबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांना विचारले असता, अशा मुद्यांवर मी अथवा केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही जाहीर भाष्य करणे उचित ठरणार नाही; रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर कोण होतील, हे अन्य कुणीही ठरवू नये, असे ते म्हणाले.
रुपयाच्या मूल्यावर दबाब
मुंबई : गव्हर्नर म्हणून मुदतीनंतर आपण राहण्यास उत्सुक नसल्याचे राजन यांचे वक्तव्य चर्चिले जात असतानाच परकीय चलन विनिमय मंचावर बुधवारी रुपयाही नरमला. डॉलरच्या तुलनेत ६७.२४ अशी वाढीसह सुरुवात करणारा रुपया राजन यांच्या वृत्तामुळे सत्रात मात्र लगेचच ६७.४६ पर्यंत घसरला. सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविणारा रुपया बुधवारअखेर १९ पैशांनी घसरत ६७.४५ वर स्थिरावला.गेल्या काही सत्रांत रुपयाने ६७च्या खालचा प्रवास नोंदविला असताना त्यात रिझव्‍‌र्ह बँकेने हस्तक्षेप केल्याचे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर राजन यांच्या मुदतवाढीच्या चर्चेनंतर स्थानिक चलनावर पुन्हा दबाव निर्माण झाला.