गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन; रिझव्‍‌र्ह बँक पतधोरण बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध

मुंबई : व्याजदर कपातीसारख्या धोरणात्मक कृतीसाठी वाव असला तरी करोना आजारसाथीने खंगलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देण्यावर दृष्टी ठेवून भविष्यात या मौद्रिक आयुधांचा समंजसपणे वापर करणे गरजेचे ठरेल, यावर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जोर दिला. अलीकडेच पार पडलेल्या बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीचे इतिवृत्त गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले.

गव्हर्नर दास यांच्या नेतृत्वात सहा सदस्य असलेल्या पतधोरण निर्धारण समितीच्या तीन दिवसांच्या विचारमंथनाअंती व्याजाचे दर आहे त्या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र भविष्यात कपातीच्या शक्यतेला जागा ठेवत, समितीने तिचे धोरण परिस्थितीजन्य लवचीक असेल असेही स्पष्ट केले.

बैठकीच्या इतिवृत्तानुसार, अर्थव्यवस्थेच्या वाढीसंबंधी तसेच महागाईविषयक आकलनात सुस्पष्टता येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहणेच प्राप्त परिस्थितीत सुज्ञतेचे ठरेल, असेही गव्हर्नर दास यांनी वक्तव्य केले.

देशांतर्गत तसेच बाह्य़ मागणीचा अभाव असल्याने, उद्योगधंद्यातही पूर्ण क्षमतेने उत्पादनाला विलंब लागेल आणि त्यापायी गुंतवणुकीच्या चक्राचेही पुनरुज्जीवन होण्यास वेळ लागेल, अशा दुष्टचक्राचा गव्हर्नर दास यांनी उल्लेख केला.

रिझव्‍‌र्ह बँकेने या बैठकीतून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढीचा अंदाज वर्तवणारी कोणतीही आकडेवारी दिली नसली तरी पहिल्या सहामाहीत तीव्र स्वरूपाचे आंकुचन, तर २०२०-२१ या संपूर्ण वर्षांत ते नकारार्थी राहील, असे स्पष्ट केले आहे.