रिझव्‍‌र्ह बँकेकडून ‘इंटरचेंज’ शुल्कात वाढ

मुंबई : दर महिन्याला मुभा देण्यात आलेल्या नि:शुल्क व्यवहारांपल्याड खातेदारांकडून एटीएमचा वापर केला गेल्यास प्रत्येक वाढीव व्यवहारासाठी २० रुपयांऐवजी २१ रुपये, तर अन्य बँकांच्या एटीएम वापरावरही त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी एटीएम इंटरचेंज शुल्क हे प्रत्येक वाढीव वित्तीय व्यवहारासाठी १५ रुपयांऐवजी १७ रुपये असा वाढविला जाणार असल्याची घोषणा केली. अर्थात ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएमचा वापर दरमहा ठरावीक नि:शुल्क व्यवहारांच्या मर्यादेबाहेर जाऊन करणे हे खातेदारांसाठी महागडे ठरेल. ही वाढीव शुल्करचना नव्या वर्षांरंभापासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या रचनेनुसार, ग्राहकांना एका महिन्यात आठ विनामूल्य एटीएम व्यवहार करण्याची मुभा आहे. यापैकी पाच नि:शुल्क व्यवहार हे ज्या बँकेचे कार्ड आहे, त्याच बँकेच्या एटीएमवर करता येतील, तर इतर बँकांच्या एटीएममध्ये तीन विनामूल्य व्यवहारांना परवानगी दिली गेली आहे. नववर्षांपासून लागू होणाऱ्या नियमानुसार, स्व-बँकेतील सहाव्या व पुढील प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकाला २० रुपयांऐवजी २१ रुपये, तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी १५ रुपयांऐवजी १७ रुपये शुल्क भरावे लागेल.