प्रशासकाच्या मदतीला तीन सदस्यीय समिती

मुंबई : गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्ज घोटाळ्यामुळे र्निबध आलेल्या ‘पीएमसी बँके’च्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादेत रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी वाढ केली असून ती आता १० हजारांवरून २५,००० रुपये करण्यात आली असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या रोकड तरलतेचा आढावा घेत ठेवीदारांना दिलासा म्हणून ही खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा आणखी शिथिल करण्यात येत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. कमाल २५ हजार रुपये रक्कम काढण्याबाबत वाढविल्या गेलेल्या मर्यादेचा लाभ बँकेच्या ७० टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना होईल, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने नमूद केले आहे.

बँकेवर २४ सप्टेंबर रोजी र्निबध लादताना लागू केलेली सर्व प्रकारच्या खात्यांमधून १,००० रुपये काढण्याची मर्यादा दोनच दिवसांत १०,००० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर आठवडाभरात ती २५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुभा बँकेवर  निर्बंध असेपर्यंत, सहा महिन्यांसाठी लागू असेल. म्हणजे सहा महिन्यांत खात्यातून कमाल २५,००० रुपयांर्पयची रक्कम काढता येणार आहे.

पीएमसी बँकेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाच्या साहाय्यार्थ तीन सदस्यांची समिती नेमण्यात आल्याचेही रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केले आहे.

पीएमसी बँकेच्या नियमित व्यवहारांवर र्निबध आणतानाच, रिझव्‍‌र्ह बँकेने २५ सप्टेंबर रोजी संचालक मंडळ बरखास्त केले आणि  जे. बी. भोरिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर खोटा ताळेबंद तयार केल्याची कबुली देणारे बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनाही पदावरून निलंबित केले गेले.

देशातील अव्वल पहिल्या १० सहकारी बँकांमध्ये समावेश असलेल्या पीएमसी बँकेत मार्च २०१९ अखेर ११,६०० कोटी रुपयांच्या ठेवींची नोंद आहे. बँकेच्या एकूण किरकोळ स्वरूपाच्या ठेवींमधील रक्कम ९१५ कोटी रुपये आहे.

एकूण ८,८८० कोटी रुपयांचे कर्जवाटप करणाऱ्या पीएमसी बँकेने ६,५०० कोटी रुपयांचे कर्ज एचडीआयएल समूहाला दिल्याचे थॉमस यांनी रिझव्‍‌र्ह बँकेला दिलेल्या पत्रात सांगितले आहे. तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने, पीएमसी बँकेच्या ४,३५५.४६ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी एचडीआयएल समूहाच्या प्रवर्तक वाधवान पिता-पुत्राला गुरुवारी अटक केली आहे. या गृहनिर्माण कंपनीचे संचालक, बँकेचे पदाधिकारी यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता.