पैशाचे नेमके स्रोत जाणून न घेता कोणत्याही कागदपत्रांविना मोठमोठय़ा गुंतवणुका स्वीकारून काळा पैसा पांढरा करण्यात गुंतलेल्या देशातील तीन प्रमुख खासगी बँकांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे रिझव्र्ह बँकेने गुरुवारी स्पष्ट केले. ‘कोब्रापोस्ट’ या संकेतस्थळाने आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस या तीन बँकांच्या विविध शाखांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उजेडात आला होता.
‘कोब्रापोस्ट’ने केलेल्या ‘ऑपरेशन रेड स्पायडर’ स्टिंग ऑपरेशनमध्ये या तिन्ही बँकांतील काही कर्मचाऱ्यांनी छुप्या वार्ताहरांकडील बेहिशोबी पैसा आपल्या विमा योजनांमध्ये गुंतवण्याची तयारी दर्शवल्याचे उघड झाले. अशा प्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक करून काळा पैसा पांढरा करण्यात येत असल्याचा आरोप संकेतस्थळाने गेल्या महिन्यात एका पत्रकार परिषदेद्वारे केला होता.
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तिन्ही बँकांनी अंतर्गत चौकशी सुरू केली होती. त्याचप्रमाणे रिझव्र्ह बँकेनेही स्वतंत्र चौकशीला सुरुवात केली होती. ‘आमची चौकशी व तपासणी पूर्ण झाली आहे. आता या बँकांवर तसेच एकंदरीत बँकिंग प्रणालीबाबत योग्य कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहेत,’ अशी माहिती रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी गुरुवारी दिली. मात्र कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तसेच याबाबतचा चौकशी अहवाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घटनाक्रम
* आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांकडून बेहिशोबी पैसा आपल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवण्याची तयारी.
* ‘ऑपरेशन रेड स्पायडर’ स्टिंग ऑपरेशनद्वारे या प्रकाराचा पर्दाफाश.
* प्रकरण उजेडात येताच तिन्ही बँकांकडून अंतर्गत चौकशीचे आदेश.
* आयसीआयसीआयच्या १८, एचडीएफसीच्या २० कर्मचाऱ्यांचे निलंबन. अॅक्सिस बँकेच्या १६ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी प्रशासकीय कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना.