रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६.७५ टक्के तर रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) देखील ४ टक्के असे स्थिर ठेवण्यात आले आहेत.
याआधी सप्टेंबरच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने अनपेक्षितरित्या अर्ध्या टक्क्य़ाची रेपोदरात कपात करण्यात आली होती. त्यामुळे यावेळीच्या पतधोरणातकडेही सर्वांचे लक्ष लागून होते. पण, कोणतेही बदल न करता रेपो रेट जैथे थे ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला.
व्याजदरातील पुढील कपात ही महागाईच्या दरावर आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून असल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी व्यापारी बँकांना व्याजदर कमी करण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाचा महागाईवर होणाऱ्या परिणामांवर रिझर्व्ह बँकेचे जवळून लक्ष असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, डिसेंबरअखेरचे अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे व्याजदर वाढीचे पाऊल तसेच फेब्रुवारीमधील मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प यानंतरच दर कपातीचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँक घेतला जाण्याची अर्थशास्त्रज्ञांची अटकळ आहे.