सलग पाच वेळा व्याजदरात कपात केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर दर कपातीला ब्रेक लावला आहे. पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ५.१५ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्के कायम ठेवला आहे. व्याजदरात आणखी कपात न करण्याच्या निर्णयामुळे फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होणार आहे. विकास दराला चालना देण्यासाठी आरबीआयने सलग पाच वेळा व्याजदरात कपात केली. त्यामुळे गेले वर्षभर फिक्स डिपॉझिटच्या गुंतवणूकीवरील व्याजदर कमी झाले. फेब्रुवारी २०१९ पासून आरबीआयने १३५ पाँईटसनी रेपो रेट कमी केले आहेत.

आणखी वाचा- रेपो दरात कोणतीही कपात नाही, रिझर्व्ह बँकेचं आर्थिक पतधोरण जाहीर

फिक्स डिपॉझिटवर काय फायदा ?
रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करुन आरबीआयने फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. गेले काही महिने सातत्याने बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात सुरु होती.

उदहारणार्थ – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक वर्षाच्या एफडीवर नोव्हेंबर २०१९ मध्ये ६.२५ टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना ६.७५ टक्के व्याज मिळत होते. तेच ऑगस्टमध्ये या एफडीवर ६.८ टक्के तर ज्येष्ठ नागरीकांना ७.३ टक्के व्याज मिळत होते. रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमधील कपातीचा परिणाम या गुंतवणूकीवर होत होता.

एफडीमधील व्याजकपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरीकांना बसत होता. कारण वयाची साठी ओलांडलेला निवृत्त झालेला हा वर्ग मोठया प्रमाणावर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतो. व्याजदरावर मोठया प्रमाणात त्यांची गणिते अवलंबून असतात.

फायनान्शिअल प्लानर्सनी ज्येष्ठ नागरीकांना छोटया गुंतवणूक योजनांवर भर देण्याचा सल्ला दिला होता.