पाव टक्का दरवाढीचा रिझव्र्ह बँकेचा कयास
आगामी आठवडय़ात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हकडून घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयाचा सामना करण्याची आपण पुरेपूर तयारी केली असल्याचे रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी येथे स्पष्ट केले. फेडच्या बैठकीत व्याजाचे दर हे ०.२५ टक्के ते १ टक्का या दरम्यान वाढू शकतील, असा अंदाजही तिने वर्तविला.
ज्या प्रकारे पाश्र्वभूमी तयार केली गेली आहे, ते पाहता फेडकडून आगामी बैठकीत व्याजाचे दर वाढतील अशी ७० ते ७५ टक्के शक्यता आहे. ही वाढ पाव ते एक टक्क्यांच्या घरात असेल, असे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मध्यवर्ती बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या येथे झालेल्या ५५५ व्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
फेडच्या व्याज दर वाढीच्या निर्णयापरिणामी बाजारातील निधीच्या ओघावर परिणाम दिसून येईल. परंतु कोणताही निर्णय आला तरी संभाव्य परिणामांचा सामना करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली असल्याचे राजन यांनी सांगितले. भारतात गुंतलेले भांडवल काढले जाण्याची आणि त्यापायी रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण पडणे अपेक्षिले जात आहे. अर्थव्यवस्थेत पुरेशी रोकड तरलता राहील, हे रिझव्र्ह बँकेकडून पाहिले जाईल. बँकांनाही अल्प मुदतीची, मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीत रोकड सुलभतेचे सर्व उपाय योजण्यास सांगितले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिझव्र्ह बँकेकडून प्रसंगी खुल्या बाजारातून अर्थात ओएमओ खिडकीद्वारे रोख्यांची खरेदी करून दीर्घावधीत रोकड उपलब्धतेची खातरजमा केली जाईल, असे राजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
येथे झालेल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक घडामोडींचा वेध घेतानाच, अर्थसाक्षरतेला प्रोत्साहनाच्या दृष्टीने उपाययोजनांचा ऊहापोह केला गेला, अशी माहिती राजन यांनी दिली.

बडय़ा धेंडांकडून कर्जवसुलीला खो घातला जाईल: राजन
बँकांची कोटय़वधींची कर्जे थकवणाऱ्या मोठय़ा कंपन्यांच्या बडय़ा प्रवर्तकांकडून बँकांच्या कर्जवसुलीला खीळ घातली जाऊ शकेल, अशी शंका व्यक्त करतानाच, बँकांनी त्या आधीच कर्जवसुलीच्या प्रक्रियेला वेगवान बनवावे, असे आवाहन गव्हर्नर राजन यांनी केले. बुडीत कर्जाच्या समस्येचा सामना करण्यासाठी बँकांकडे अनेक प्रकारची आयुधे उपलब्ध आहेत. या उपयांचा वापर वेळीच व गतीने केला जावा, असे आपल्याला अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.