रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरूच

मुंबई : व्याजदर बदलाबाबत निर्णय घेण्यासाठी सुरू असलेली रिझव्‍‌र्ह बँकेची बैठक बुधवारीही सुरू राहिली. तीन दिवसांच्या चर्चेनंतर प्रत्यक्ष पतधोरण समितीचा निर्णय गुरुवारी सकाळी जाहीर होणे अपेक्षित आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे यंदाचे हे चालू आर्थिक वर्षांचे शेवटचे द्वैमासिक पतधोरण आहे. तसेच नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली ते पहिल्यांदाच निर्धारीत होत आहे.

गव्हर्नर दास हेच अध्यक्ष असलेल्या पतधोरण समितीची दरनिश्चितीकरिता मंगळवारी बैठक सुरू झाली. यंदा या बैठकीत दरकपातीची अपेक्षा व्यकत केली जात आहे. त्याला कारण डिसेंबर २०१८ मध्ये १८ महिन्यांच्या तळात (२.१९ टक्के) पोहोचलेला किरकोळ महागाई निर्देशांक आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे यंदाचे सहावे द्वैमासिक पतधोरण असून यापूर्वीच्या तीन पतधोरणात स्थिर व्याजदराचे धोरण अवलंबिले गेले आहे; तर दोन द्वैमासिक पतधोरणात प्रत्येकी पाव टक्के दरकपात झाली आहे.

६.५० टक्के स्थिर असलेला रेपो दर पाव टक्क्याने कमी होण्याचा अंदाज अनेक वित्तसंस्था, बँकप्रमुखांनी व्यक्त केला आहे. दरबदलाकरिता रिझव्‍‌र्ह बँकेसाठी किरकोळ महागाई निर्देशांक ४ टक्के (अधिक, उणे २ टक्के) आवश्यक आहे.

लाभांश वितरण निर्णयाची बैठक  लांबणीवर

सरकारकडे लाभांश वितरित करण्याबाबतचा रिझव्‍‌र्ह बँकेचा निर्णय लांबणीवर पडला आहे. याबाबत येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आता १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या बैठकीला अर्थमंत्रीही संबोधित करण्याची शक्यता आहे.