मुंबई : अपेक्षेप्रमाणे स्थिर व्याजदराचा निर्णय घेणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचा देशाच्या विकासदराबाबतचा अंदाज मात्र उंचावला आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारच्या द्वैमासिक पतधोरणाच्या निमित्ताने देशासमोर महागाईचे आव्हान कायम असल्याची चिंता व्यक्त केली.

चालू वित्त वर्ष २०२०-२१ साठी यापूर्वी उणे ९.५ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर जाहीर करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने आता हा अंदाज काहीसा सुधारत उणे ७.५ टक्क्यांचा बांधला आहे. विद्यमान वित्त वर्षांच्या शेवटच्या दोन्ही तिमाहीत विकास दर शून्याच्या आसपासच राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये तो ०.१ टक्के, तर जानेवारी ते मार्च २०२१ मध्ये तो ०.७ टक्के असेल. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच तिमाहीत विकास दर उणे २३.९ टक्क्यांपर्यंत रोडावला, तर दुसऱ्या तिमाहीत तो उणे मात्र, ७.५ टक्के नोंदला गेला. दास यांनी तांत्रिक आर्थिक मंदीची शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

व्याजदर किमानच

सलग तीन दिवस चालणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहा-सदस्यीय पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख रेपो दर ४ टक्के असा किमान पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. चालू वर्षांत आतापर्यंत १.११ टक्के दरकपात झाली आहे. यापूर्वीची दरकपात २२ मे रोजी झाली.

रिझव्‍‌र्ह बँक उवाच :

* संपर्करहित कार्ड व्यवहार मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत

* अविरत आरटीजीएस सेवेला येत्या काही दिवसांतच सुरुवात

* सहकारी बँकांना लाभांश वितरणास मार्च २०२० पर्यंत बंदी कायम

* पीएमसी बँकेच्या पुनर्बाधणीचा तिढा लवकरच सुटणार

* मोठे उद्योग, वित्तसंस्थांच्या बँक परवान्याबाबत सकारात्मक

’ क्षेत्रीय ग्रामीण बँकांनाही रिझव्‍‌र्ह बँकेची रोकड उपलब्धता

’ तंत्रस्नेही रक्कम देय सुरक्षित नियंत्रण निर्देश जारी करणार

वाढत्या महागाईचे आव्हान कायम

भारतीय अर्थव्यवस्थेपुढील वाढत्या महागाईचे आव्हान तूर्त कायम राहण्याची भीती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. प्रामुख्याने अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे किरकोळ महागाईचा दर २०२०-२१ मध्ये ६ टक्क्यांच्या जवळपास असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मध्यवर्ती बँकेच्या सहनशील अशा ४ टक्क्यांपुढे असणारा महागाई दर दुसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के, तर तिसऱ्या तिमाहीत ५.८ टक्के असेल, असे स्पष्ट करण्यात आले. सप्टेंबर २०२० मध्ये संपलेल्या पहिल्या अर्धवार्षिकात तो ५.२ ते ४.६ टक्के असेल, असे नमूद करण्यात आले.