रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. पुढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याचं दास म्हणाले. तसंच पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली. दरम्यान, यावेळीही रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. २ डिसेंबर पासून रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात झाली होती.

“रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रेपो दर हे चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती दास यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. बँक रेटमध्येदेखील कोणतेही बदल करण्याचा निर्णय झाला नाही. ते ४.२५ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह रेशो तीन टक्क्यांवर कायम असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, पुढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली.

“अर्थव्यवस्थेत पुरेशी रोख रक्कम उपलब्ध असेल याची आम्ही खात्री देतो. तसंच गरज भारल्यास आवश्यक ती पावलंही उचलली जातील. पुढील तिमाहीतील जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून ०.१० टक्के करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान देशातील जीडीपी वाढ ०.७० टक्के राहिल असा अंदाज आहे,” असं दास म्हणाले. तसंच संपूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर उणे ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर उणे मधून सकारात्मक होण्याची शक्यता असल्याचं दास म्हणाले. सरकारकडून देण्यात आलेल्या मदतीमुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास मदत झआली आहे. तसंच मॅन्य़ुफ्रक्चरिंग पीएमआय पुन्हा एकदा एक्सपँशन मोड म्हणजेच ५० च्या वर गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यात उत्पादन दर सकारात्मक झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात पीएमआय विकसित बाजारांच्या तुलनेत पोहोचला असल्याचंही त्यांनी सांगितलं. कमर्शिअल बँक २०१९-२० या कालावधीसाठी लाभांश देणार नाही. तिसऱ्या तिमाहीत ग्राहक निर्देशांकावर आधारित महागाई ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केलं. पुढील काही दिवसांमध्ये आरटीजीएस सेवा ग्राहकांसाठी २४ तास आठवड्याच्या सर्व दिवसांसाठी सुरू राहिल. कोणतीही मोठी रक्कम देताना बँक सुरू होण्याची किंवा बँक बंद होण्याची वेळ पाहावी लागणार नसल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.