‘‘मी इथे काही मागायला आलो तर मला खात्री आहे की रिझव्र्ह बँक मला नाराज करणार नाही’’, असे उद्गार रिझव्र्ह बँकेच्या ८०व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काढून अप्रत्यक्ष रेपो दरात कपातीची मागणी करणाऱ्या खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी जाहीर पत धोरणात निराश व्हावे लागण्याचीच शक्यता अधिक असल्याचे मत बँकिंग क्षेत्रातील धुरिणींनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी मुंबई भेटीत नेमकी मागणी जाहीर न करता याबाबत अनेकांना व्याजदर कपातीच्या मागणीबाबत अंदाज व्यक्त करावयास लावले. अनेकांनी दर कपातीची मागणीबाबत आपापले अंदाज व्यक्त केले असले तरी ही मागणी दुसरी – तिसरी कुठली मागणी नसून रेपो दर कपातीचीच असल्याचे रिझव्र्ह बँकेलाही कळून चुकले आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे मंगळवार, ७ एप्रिल रोजी चालू आíथक वर्षांसाठीचे पतधोरण सकाळी जाहिर करणार आहेत. या पाश्र्वभूमीवर राजन यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी गेल्या आठवडय़ात केलेली मागणी रेपो दर कपातीचीच आहे, हे सांगण्यास तज्ज्ञ अर्थ भविष्यकाराची गरज मुळीच नाही. २०१५ मध्ये पहिल्यांदा, १४ जानेवारी रोजी व दुसऱ्यांदा ४ मार्च रोजी रिझव्र्ह बँकेने रेपो दरात प्रत्येकी पाव टक्के दर कपात केली. ही व्याजदर कपात पतधोरणबाह्य़ होती. अवघ्या काही दिवसांवर पतधोरण जाहिर करण्याची वेळ आली असताना तत्पूर्वीच दर  कपातीचा आश्चर्यकारक धक्का देण्याचे तंत्र डॉ. राजन यांनी यावेळी अंगिकारले होते.
‘फेडरल बँके’चे निधी व गुंतवणूक प्रमुख व अध्यक्ष आशुतोष खजुरिया म्हणाले की, हे वार्षकि पतधोरण असल्याने त्याचे बँकिग विश्वात विशेष महत्त्व आहे. वर्षभरात सहा वेळा रिझव्र्ह बँक पत आढावा घेत धोरणात आवश्यक ते बदल करीत असते. तीन महिन्यांच्या काळात दोनदा व शेवटची दर कपात केवळ महिन्याभरापूर्वी झाल्याने या वेळी रेपो दर कपात निव्वळ असंभव आहे.
ही दरकपात असंभव असल्याची कारणे विषद करताना खजुरिया म्हणाले, सध्या भारताचे पतधोरण एका संक्रमणातून जात आहे. रिझव्र्ह बँकेने दोन वेळा प्रत्येकी पाव टक्याने रेपो दर कपात करूनही बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदारात कपात केली नाही; परंतु आपले ठेवींचे दर कमी केले आहेत. आज देशातील व्याजदर कमी होणे अपेक्षित असल्याने प्रत्यक्ष दर कपात होण्याआधी ठेवीदार बँकाच्या ठेवीत पसे गुंतवत असल्याने बँकांनी ठेवींवरील दर कपात टाळली आहे. याचे दुसरे कारण वर्षअखेर असल्याने बँकांना आपला ताळेबंद ही सुस्थितीत आणता आला. साहजिकच रिझव्र्ह बँकेने केलेली दरकपात प्रत्यक्ष कर्जदारांपर्यंत पोहोचलेली नाही. ही दरकपात कर्जदारांपर्यत संक्रमित न झाल्याने महिन्याभरात पुन्हा रेपो दर कपातीची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असेही खजुरिया म्हणाले.
दहा वर्षांच्या केंद्र सरकारच्या रोख्यांच्या परताव्याचा दर येत्या काही दिवसात ७.५५ टक्के जाणे अपेक्षित असल्याचे खजुरिया म्हणाले. १५ मार्च रोजी प्राप्तीकराचा चौथा व शेवटचा अग्रीम कर भरणा होऊनही आंतरबँक व्याजदर वर गेले नाहीत जे दरवर्षी या सुमारास जातात. याचे कारण बँकांनी अग्रीमकर भरण्यासाठी सरकारी रोखे विकल्याने रोख्यांच्या किंमती खाली आल्या हे रोखे म्युच्युअल फंडानी विकत घेतल्याने एका अर्थाने अर्थव्यवस्थेतील रोकडीचे पुर्नसतुलन झाले. आता वर्षअखेर झाल्याने बँका ठेवी व कर्जाचे दर कमी करतील अशी आशाही खजुरिया यांनी व्यक्त केली.
महागाईचा दर गेल्या काही दिवसात जरी कमी झाला असला तरी अवकाळी पावसाने देशातील अनेक राज्यात हाताशी आलेले कृषी उत्पादन नष्ट झाल्याने डाळी व कडधान्य यांच्यासोबत कांदा व तेलबिया यांचे भाव वर जाण्याचा धोका असल्याने महागाईचा दर मे – जूननंतर खाली राहिलच, असे नाही तसेच येमेनवरील हल्ल्याने कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वर गेले असून नियंत्रणात असलेली वित्तीय तुट पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुन्हा व्याजदर कपात होण्याची शक्यता नाही. मात्र पुढील एका वर्षांत वैधानिक रोखता प्रमाण (एसएलआर) मात्र एका टक्क्याने कमी होऊन २० टक्क्य़ांवर येण्याची शक्यता आहे. या बाबतचे स्पष्ट संकेत रिझव्र्ह बँक देईल, असेही खजुरिया म्हणाले. यंदा रेपो दरात जरी कपात झाली नाही तरी रोख राखीव प्रमाणात कपात होण्याची शक्यता वाटते, असे स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक व आíथक संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. सौम्यकाती घोष यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कर्जावरील बँकाचे नफ्याचे प्रमाण कमी होण्याची भीती असल्याने बँका व्याजदर कमी करीत नाहीत. जर रोख राखीव प्रमाणात कपात केली तर बँकांना कर्ज वितारणासाठी जास्त निधी उपलब्ध होऊन व्याजदारात कपात केल्याने कमी होणाऱ्या नफ्याची काही प्रमाणात भरपाई होईल. रिझव्र्ह बँकेने जर रोख राखीव प्रमाणात अध्र्या टक्क्याची कपात केल्यास अद्यावत आकडेवारीनुसार ४५,७०० कोटी बँकांना अतिरिक्त उपलब्ध होतील. हा अतिरिक्त उपलब्ध होणारा निधी कर्ज वाटपासाठी वापरला तरी ३,५०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न बँकांना मिळू शकेल, असेही डॉक्टर घोष म्हणाले.
रुपया ३० पैशांनी भक्कम
नव्या आर्थिक वर्षांच्या व्यवहारातील पहिल्याच दिवशी भारतीय चलन तब्बल ३० पैशांनी भक्कम बनले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ३० पैशांनी उंचावत ६२.१९ पर्यंत पोहोचला. यापूर्वीच्या दोन व्यवहारात तो ४८ पैशांनी रोडावला होता. परकी चलन व्यवहारात नव्या आर्थिक वर्षांत सोमवारी प्रथमच डॉलर-रुपया दरांची तुलना झाली. सलगच्या सुटीमुळे हे व्यासपीठ १ एप्रिलपासून बंदच होते. सोमवारचा रुपयाचा प्रवासच ६२.१० या वरच्या टप्प्यावर सुरू झाला. सत्रात तो ६२.१० याच दिवसाच्या उच्चांकावर राहिला. तर सत्रातील त्याचा तळ हा ६२.२४ होता. यापूर्वी ३१ मार्च रोजी रुपया ६२.४९ वर होता. रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणापूर्वी रुपयात अध्र्या टक्क्य़ाची वाढ नोंदली गेली आहे.