आज रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण

औद्योगिक उत्पादनांची संथ वाढ, खासगी क्षेत्रातून रोडावलेल्या गुंतवणुकीच्या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेचे वार्षिक पतधोरण आढावा बैठक तसेच एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठीचे पतधोरण जाहीर करण्यासाठी पतधोरण निश्चिती समितीची (एमपीसी) दोन दिवसांची बैठक बुधवारपासून येथे सुरू झाली. कर्जाच्या व्याजदरावर परिणाम साधणाऱ्या रेपो दरात बदल अपेक्षित नसून उलट निश्चलनीकरणामुळे बँकिग व्यवस्थेत निर्माण झालेली अतिरिक्त रोकड सुलभता कमी करण्यासबंधी उपाय योजले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जानेवारीच्या महागाई निर्देशांक व औद्योगिक उत्पादन दर निर्देशांकांच्या आकडेवारीत मार्च महिन्यापर्यंत विशेष बदल झाला नसल्याने, व्याजदरात बदल होण्याची फार आशा नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत व्याजाचे दरवाढीचे सुस्पष्ट पथ स्वीकारला असल्यानेही रिझव्‍‌र्ह बँकेकडून आपल्या  व्याजदरात छेडछेडाची शक्यता कमीच आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून अद्याप निश्चलनीकरणानंतर बाद ठरलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा किती प्रमाणात जमा झाल्या याचा अधिकृत आकडा जाहीर केला नसला तरी काही ठोस अंदाजानुसार हा आकडा १४ लाख कोटी रुपयांच्या घरात असण्याचा कयास आहेत.  निश्चलनीकरणानंतर बँकांकडील वाढलेल्या ठेवी फेब्रुवारीपश्चात कमी होतील, या रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेच्या विपरीत उलट ठेवी वाढल्याच आहेत.

मागील आर्थिक वर्षांत १० मार्चपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेने १० लाख कोटींचे रोखे खरेदी करून अतिरिक्त रोकड सुलभता कमी केली आहे. फेब्रुवारीनंतर रुपयाच्या विनिमय दरात सुधारणा झाल्याने निर्यात होणाऱ्या वस्तू व सेवा महाग झाल्या आहेत. २३ जानेवारीपासून रुपयाच्या विनिमय दरात ५.२ टक्के सुधारणा झाली आहे. निर्यातीत मोठी वृद्धी होत नसल्याने रुपया सुदृढ झाल्यास त्याचा विपरीत परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेसमोर रुपया डॉलरच्या तुलनेत फारसा वधारणार नाही हे पाहणे आवश्यक झाले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे मागील वर्षांत मार्च २०१७ पर्यंत महागाईचा दर ४ टक्के राखण्याचे लक्ष्य ठरविले होते. हे लक्ष्य गाठण्यात रिझव्‍‌र्ह बँक यशस्वी झाल्याने आर्थिक वर्ष २०१८ साठी महागाईचा दर ४ टक्के व त्यात २ टक्के कमी-अधिक बदल असलेले महागाईचे लक्ष्य राखले जाण्याची आशा आहे. फेब्रुवारी महिन्यातील पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेला महागाईचा दर ४-४.५ टक्के अपेक्षित असल्याचे बँकेने म्हटले होते.

कपातीला प्रतिकूल घटक

या आधीच्या म्हणजे ८ फेब्रुवारी २०१७ रोजी जाहीर झालेल्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने भविष्यात ‘जळवून घेणाऱ्या परिस्थितीजन्य’ पतधोरणाकडून, ‘तटस्थता राखणारे’ पतधोरण असे संक्रमण स्पष्ट केले होते. नवीन नोटांच्या पुनर्भरणानंतर अर्थव्यवस्थेत चलनविनिमय वाढल्याची रिझव्‍‌र्ह बँकेने दखल घेतली. निश्चलनीकरणानंतर बँकांकडील वाढलेल्या ठेवी कमी होत जाण्याची अपेक्षाही व्यक्त केली गेली होती. प्रत्यक्षात निश्चलनीकरणाचा परिणाम अजून जाणवत असल्याने व बँकांच्या कर्जातील वाढ मागील ५० वर्षांच्या तळाला असल्याने तर बँकांच्या ठेवीतही फेब्रुवारीच्या तुलनेत आणखी वाढ झाली आहे.