करोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा लवकर सावरली असून देशाचा विकास दर तिसऱ्या तिमाहीत सकारात्मक नोंदला जाण्याबाबतचा आशावाद रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचा वेग सकारात्मक, मात्र शून्य टक्क्य़ाच्या आसपास असेल, असे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. अर्थव्यवस्थेचा वेग गेल्या दोन्ही तिमाहीत उणे राहिला आहे.

‘भारताची अर्थव्यवस्था’ या मथळ्याने मध्यवर्ती बँकेने गुरुवारी प्रकाशित केलेल्या नियतकालिकात भारतीय अर्थव्यवस्था कोविड-१९ सारख्या वैश्विक साथीच्या आजार संकटातून सावरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसात संपणाऱ्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर ०.१ टक्के नोंदला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. करोनासाथ सप्टेंबरच्या मध्यापासून आटोक्यात आल्याचेही म्हटले आहे.

करोना साथीचा प्रसार आणि टाळेबंदी दरम्यान केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा हवाला देत ‘आत्मनिर्भर भारत मोहिमे’ला क्रयशक्ती वाढण्यासाठीच्या प्रोत्साहनाचे बळ मिळाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

टाळेबंदी शिथिल होताच जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होऊन पूरक धोरणे अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यास मदतनीस ठरली, असा शेरा अहवालात आहे.

नियतकालिकेतील मते ही मध्यवर्ती बँकेचीच असतील, असे नव्हे, असे स्पष्ट करत भारताच्या अर्थव्यवस्थेचे भविष्य रेखाटताना, अनेक वित्तसंस्थांनी ती चालू आर्थिक वर्षांत उणे स्थितीतच असेल, असे म्हटल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

‘इंडिया रेटिंग्ज’ने विकास दर आशावाद उंचावला

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस विकास दर नोंदविणाऱ्या भारताबाबतच्या तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत इंडिया रेटिंग्जने अधिक आशावाद व्यक्त केला आहे. पतमानांकन संस्थेनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर उणे ७.८ टक्के असेल. इंडिया रेटिंग्जने यापूर्वी, याच कालावधीसाठी उणे ११.८ टक्के विकास दराचे भाकीत वर्तविले होते. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन पहिल्या तिमाहीतील उणे २३.९ टक्क्य़ांच्या तुलनेत उणे ७.५ टक्के नोंदले गेले होते.