रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारी द्विमाही पतधोरणाचा आढावा घेणार आहे. या पत धोरणात रोपो दर कपात अध्याप तरी दूरच असल्याचा अर्थतज्ज्ञांचा कयास आहे. आर्थिक वृतांकन करणाऱ्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सोमवारी देशातील बँका व अर्थसंस्थांच्या अर्थतज्ज्ञाच्या सर्वेक्षणाला ४३ अर्थतज्ज्ञांनी प्रतिसाद दिला. प्रतिसाद दिलेल्या सर्वच अर्थतज्ज्ञाना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन रेपो दर स्थिरच ठेवतील, असे वाटत असल्याचे सांगितले.
चालू आर्थिक वर्षांच्या सुरवातीच्या महिन्यांपासून औद्योगीक उत्पादनाने जोर धरला आहे. एप्रिल – जून या पहिल्या तिमाहीत वीज उत्पादन पेट्रोलियम पदार्थ उत्पादन आदी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादनाने ४.०३ टक्के वाढ दर्शविली आहे. मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादनात ०.१ टक्के घट नोंदविली होती.
एका बाजुला औद्योगिक उत्पादनात सुधारणा होऊन अर्थव्यवस्था रुळावर येते असे वाटत असतांनाच महगाईच्या दराने ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये १० टक्क्याची वेस ओलांडलेल्या पातळीवरून माघारी प्रवास सुरू झाला आहे. जून महिन्याच्या ठोक किंमतीवर आधारित महागाई दराने ७.३ टक्क्याची वाढ नोंदवली आहे. महागाईचा दर जरी कमी झाला तरी त्याचे खरे कारण मागील वर्षी महागाईचा दर जास्त असल्यामुळे त्याच्या तुलनेत मे व जून महिन्यात घट झाल्याचे दिसत आहे. जून महिन्यात पावस सरासरी पेक्षा कमी झाला. जुल महिन्यात पावसाने जून महिन्यातील कसर जरी भरुन काढली तरी अजूनही पावसाची नोंद सरापेक्षा ४३ टक्क्याने कमी आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
रिझव्‍‌र्ह बँकेने औद्योगिक उत्पादन व महागाई नियंत्रणात यामध्ये महागाई नियंत्रणाला आपली प्राथमिकता असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. युक्रेन व इराकमधील उद्रेकामुळे कच्च्या तेलाचे दर सातत्याने प्रति पिंप ११० डॉलरच्या वरच राहिलेले आहेत.
पावसाची कमी व चढे कच्च्या तेलाचे भाव यामुळे महागाई सध्याच्या पातळीवर राहील याची शक्यता पडताळून पाहूनच रिझव्‍‌र्ह बँक पुढील धोरण आखेल. रिझव्‍‌र्ह बँकेने नेमलेल्या डॉ. ऊर्जति पटेल समितीने जानेवारी २०१५ पर्यंत महगाईचा दर ८ टक्के तर जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्के आणण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. सद्य स्थितीत जर व्याजदर कपात केली जानेवारी २०१६ च्या महागाईच्या नियंत्रणाचे उद्दिष्ठ गाठणे कठीण होईल. जून महिन्यात जाहीर केलेल्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवत ‘एसएलआर’मध्ये पाव टक्क्यांची कपात केली होती.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची वर्षपूर्ती होण्यास महिन्याचा कालावधी शिल्लक असताना डॉ. रघुराम राजन मंगळवारी नवे पतधोरण घेऊन येत आहेत. यंदाचे पतधोरण हे केंद्रात भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरचे राजन यांचे पहिले असे पतधोरण असेल. जवळपास साडे चार वर्षांच्या नीचांकाला घाऊक व चार महिन्याच्या तळात गेलेल्या किरकोळ महागाई निर्देशांकानंतर यंदा व्याजदर कपातीला वाव आहे. तुलनेने पाऊसही बऱ्यापैकी व औद्योगिक उत्पादनही काहीसे वधारलेले आहे. मात्र एकूणच महागाई अद्यापही रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधानकारक अशा पातळीवर नसल्याने यंदाही पतधोरण स्थिरच, कोणत्याही व्याजदर कपात अथवा वाढीशिवायचेच असेल, अशीच दाट शक्यता आहे.
जून महिन्याच्या ठोक किंमतीवर आधारित महागाई दराने ७.३ टक्क्याची वाढ नोंदवली आहे.
एप्रिल – जून या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादनाने ४.०३ टक्के वाढ दर्शविली आहे.
जून महिन्यात पावस सरासरी पेक्षा कमी झाला. जुल महिन्यात कसर जरी भरुन काढली तरी पावसाची नोंद सरापेक्षा ४३ टक्क्याने कमी आहे.

महागाईचा दर अद्याप रिझव्‍‌र्ह बँकेच्या सुसह्य दरापेक्षा खुपच जास्त असल्याने उद्या जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कपातीची शक्यता नाही. महागाईचा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सुसह्य पातळीवर येण्यास वेळ लागणार असल्याने व्याजदर कपातीसाठी अजून ८ ते १२ महिने वाट पहावी लागेल.
सुधीर अग्रवाल, निधी व्यवस्थापक (स्थिर उत्पन्न योजना), युटीआय म्युच्युअल फंड

रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण नेहमीच भुतकाळापेक्षा भविष्यातील अर्थव्यवस्थेला असलेल्या धोक्यांचा विचार करूनच आखले जाते. महागाईनियंत्रण हा सर्वाचाच कळीचा प्रश्न असल्याने दर कपातीची शक्यता वाटत नाही. त्याच बरोबरीने जगातील पातळीवर व्याजदर व महागाईचा दर खालीच राहणार असल्याने रिझव्‍‌र्ह बँकदेखील दरवाढ करण्याची शक्यता ही कमीच आहे.
डॉ. रुपा रेगे, अर्थतज्ज्ञ व महाव्यवस्थापक, बँक ऑफ बदोडा