मुख्याधिकाऱ्यांचे अधिकारही गोठविले

राष्ट्रीयकृत पंजाब नॅशनल बँकेच्या १३,००० कोटी रुपयांच्या हिरे व्यापारी निरव मोदी थकित कर्ज फसवणूक प्रकरणात तत्कालिन महिला मुख्याधिकाऱ्याचे नाव केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आरोपपत्रात आल्यानंतर अलाहाबाद बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी तातडीने र्निबध लागू केले.

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रमण्यन या सध्या अन्य राष्ट्रीयकृत अलाहाबाद बँकेच्या मुख्याधिकारी आहेत. निरव प्रकरणात उषा यांच्यासह पीएनबीच्या दोन संचालकांसह तब्बल २० अधिकाऱ्यांचा तपास यंत्रणांनी सोमवारी आरोपपत्रात समावेश केला. यानंतर केंद्रीय अर्थ खात्याच्या सेवा विभागाने बँकेच्या उषा यांचे अधिकार काढून घेण्याचे फर्मान सोडले. त्याबाबतची कल्पना बँकेच्या संचालक मंडळाने उषा यांना देऊन कार्यवाही करण्यास सुचविले.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पुढाकाराने निरव प्रकरणात पहिलेच आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने अलाहाबाद बँकेवर ठेवी, कर्जाबाबत मर्यादा आणल्या आहेत. बँकेबरोबरच्या व्यवसायातील धोके लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले.

उषा या २०१५ ते २०१७ दरम्यान पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. पहिल्या भारतीय महिला बँकेचेही अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते.

उषा यांचे सर्व अधिकार काढून घेण्याच्या सूचना अर्थ व्यवहार खात्याने बँकेच्या संचालक मंडळाला केल्या आहेत. पीएनबीचे कार्यकारी संचालक के. व्ही. ब्रह्माजी राव आणि संजीव शरण व सर व्यवस्थापक नेहाल आहाड यांची नावे आरोपपत्रात आहेत. यापूर्वी तपास यंत्रणांची आयडीबीआय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली आहे.

कार्यवाहीसाठी बँकेची आज बैठक

उषा यांच्यावरील कार्यवाहीसाठी अलाहाबाद बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबतची कल्पना बँकेने सोमवारी उशिरा भांडवली बाजाराला दिली. केंद्रीय अर्थखात्याकडून याबाबतची सूचना आल्याने बैठकीचा निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

त्या११ बँकांचा गुरुवारी आढावा

वाढत्या बुडित कर्जामुळे कारवाईसाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेखीखाली आलेल्या ११ सार्वजनिक बँकांचा आढावा येत्या गुरुवारी सरकारी स्तरावर घेतला जाणार आहे. केद्रीय अर्थ व्यवहार सचिव राजीव कुमार यांनी, गुरुवारच्या बैठकीत या बँकांचा थकित कर्जातून मार्ग काढण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले. सोमवारीच अलाहाबाद बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध आणले. गेल्याच आठवडय़ात देना बँकेवरही कर्ज वितरण आणि नोकरभरतीबाबत मध्यवर्ती बँकेने सूचना केली होती.