रिझव्‍‌र्ह बँकेकडून कोणालाही आपल्या खात्यात पसे भरा असा ईमेल पाठवला जात नाही; नागरिकांनी अशा फसव्या ईमेलवर विसंबून आपली कुठलीही खाजगी माहिती त्रयस्त व्यक्तींना देऊ नये, अशा शब्दात मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बँक खातेधारक, ग्राहकांना सावध केले.

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) च्या ‘यूनायटेड पेमेंट्स इंटरफेस’ (यूपीआय) या नव्या ऑनलाईन पेमेंट पर्यायाचा शुभारंभ गव्हर्नर डॉ. राजन यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँकेकडे सुमारे ८ लाख कोटींचे भारत सरकारचे रोखे व ३६० अब्ज डॉलर इतक्या परकीय चलनातील रोखे गुंतवणूक आहे. आम्हाला कोणच्याही पशाची गरज नाही.

रिझव्‍‌र्ह बँक व गव्हर्नर यांचे नाव, छायाचित्र, बोधचिन्ह वापरून गेल्या काही महिन्यांपासून ईमेल असणाऱ्यांना लॉटरी जिंकल्याने बक्षिसाची रक्कम जमा करण्याच्या किंवा अन्य कारणांनी मोठी रक्कम जमा होण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची प्रकरणे वाढली आहेत. याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेकडेही येणाऱ्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे राजन यांनी यावेळी सांगितले.

‘एनपीसीआय’च्या रोख रकमेची डिजिटल रुपात देवाण घेवाण करणारे एक अ‍ॅपही यावेळी गव्हर्नरांच्या प्रमुखे उपस्थितीत बँक खातेदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. याबाबत जगातील सर्वात सुरक्षित, सर्वात स्वस्त व कुणालाही सहज उपलब्ध होणाऱ्या या अ‍ॅपमुळे भारतीय बँकिंग विश्वात क्रांती होणार असल्याचे राजन यांनी सांगितले.

मोबाइलच्या वाढत्या वापराचा उपयोग अर्थव्यवस्थेतील रोकड हाताळणी घटविणारे अ‍ॅप विविध २९ बँकांनी आपल्या ग्राहकांना देण्यास सुरुवात केली असून अन्य बँका लवकरच ही सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या अर्थ व्यवस्थेत रोकड कमी करून जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल रुपात आणण्याच्या प्रयत्नांचा एक हा एक भाग असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या प्रसंगी ‘एनपीसीआय’चे मानद सल्लागार व नंदन निलेकणी यांनी, हे अ‍ॅप रिक्षावाला, भाजीवाला या सारखे सामान्यातील सामान्य बँक खातेदार हे अ‍ॅप आपापल्या सेवांचे मोल घेण्याकरिता वापरू शकतील, असे सांगितले. ‘एनपीसीआय’चे भाग धारक असलेल्या प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापकीय संचालक कार्यकारी संचालक व अन्य अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.