रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या रेपो दरात 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दरातील कपातीनंतर आता नवा दर 5.40 टक्के झाला आहे. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रिव्हर्स रेपो दर  5.15 टक्के झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पतधोरण समितीच्या सदस्यांपैकी 4 सदस्यांनी रेपो दरात 0.35 टक्के कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. तर दोन सदस्यांनी 0.25 टक्क्यांनी कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रिझर्व्ह बँकेने महागाईचे लक्ष्य 3.1 टक्के ठेवले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

महागाई स्थिरावत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदर कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या सलग तीन द्विमासिक पतधोरणात प्रत्येकी पाव टक्का दर कपात केली आहे. यामुळे एकूण पाऊण टक्के दर कमी झाले आहेत; मात्र व्यापारी बँकांनी प्रत्यक्षात 0.21 टक्के दर कपातीचाच लाभ कर्जदारांना देऊ केल्याची खंत खुद्द गर्वनरांनी व्यक्त केली होती. पतधोरण बुधवारी जाहीर होण्यापूर्वी काही व्यापारी बँकांनी त्यांचे ठेवींवरील व्याज कमी केले केल्याचे समोर आले होते.