नवी दिल्ली : निश्चलनीकरण प्रक्रियेत बाद झालेल्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी १७ महिने लागले; मात्र त्यासाठी किती खर्च आला ही माहिती रिझव्‍‌र्ह बँक आजही उघड करू इच्छित नाही.

८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू झालेल्या निश्चलनीकरण प्रक्रियेत ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा बाद ठरल्या. एकूण १५,३१,०७३ कोटी रुपये मूल्याच्या या बाद नोटा बँकांमध्ये जमा झाल्या. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या बाद झालेल्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा  बँकांकडे परत आल्या नाहीत.

बाद नोटांचे काय केले आणि त्या नष्ट करण्यासाठी किती खर्च आला या आशयाच्या माहितीची विचारणा मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौड यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे केली होती. माहितीच्या अधिकारांतर्गत करण्यात आलेल्या अर्जाला रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागाने २९ ऑक्टोबर रोजी प्रतिसाद दिला आहे.

मात्र निश्चलनीकरण प्रक्रिया आणि बाद नोटांच्या विल्हेवाटीसाठी आलेला खर्च सांगण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने नकार दिला आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या आणि बँकांकडे परत न आलेल्या नोटांच्या रकमेचा तपशील रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे. बाद नोटांचे तुकडे करून ते मार्च २०१८ पर्यंत नाहीसे केले गेले; मात्र त्यासाठी किती खर्च आला हे सांगता येणार नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

माहितीच्या अधिकारात गौड यांनी बाद आणि नाहीशा करण्यात आलेल्या ५०० व १,००० रुपये मूल्याच्या नोटांचे वर्गीकरण मागूनही रिझव्‍‌र्ह बँकेने ते दिलेले नाही. रिझव्‍‌र्ह बँकेने सरलेल्या ऑगस्टमध्ये म्हणजे १७ महिन्यांनंतर निश्चलनीकरणापूर्वी चलनात असलेल्या एकूण बाद नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्याचे जाहीर केले होते.