रिझव्‍‌र्ह बँकेकडून यंदा ‘जैसे थे’ कलाचा अर्थविश्लेषकांचा होरा
रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७ जूनला नियोजित आर्थिक वर्षांतील दुसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर आहे त्या पातळीवर स्थिर ठेवण्याकडे कल असेल, असे बहुतांश अर्थविश्लेषकांचे कयास आहेत. या आधीच्या एप्रिलमधील बैठकीत रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर पाव टक्क्यांनी कमी करून तो पाच वर्षांपूर्वीच्या ६.५० टक्क्यांवर खाली आणला आहे.
प्रत्यक्ष देशात पाऊस-पाण्याची स्थिती काय हे पाहूनच, जुलै-सप्टेंबर तिमाहीत व्याजाचे दर खाली आणले जाण्याबाबत मात्र बहुतांशांनी सकारात्मकता दर्शविली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वच ४४ अर्थविश्लेषकांनी, ७ जूनच्या पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर जैसे थे, तर आगामी तिमाहीत किमान रेपो दर आणखी पाव टक्के खाली म्हणजे ६.२५ टक्क्यांवर आणला जाईल, असे कयास व्यक्त केले आहेत.
सरलेल्या जानेवारी ते मार्च तिमाहीत ७.९ टक्के आर्थिक विकासदर नोंदवून, जगातील एक सर्वात वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान मजबूत केले आहे. सलग दोन वर्षे पावसाने ओढ धरली असतानाही हे शक्य झाल्याने, यंदा अंदाजले गेल्याप्रमाणे दमदार पाऊस झाल्यास ते अर्थव्यवस्थेला आणखी गती देणारेच ठरेल.
तथापि, पाऊस चांगला झाल्यास, त्यातून ग्रामीण बाजारपेठेला नवसंजीवनी मिळेल. परंतु ग्रामीण क्रयशक्ती वाढीचे महागाई दरात वाढीला चालना देणारेही परिणाम संभवतात. त्यामुळे पाऊस जरी चांगला झाला तरी रेपो दरात पाव टक्क्यांपेक्षा अधिक कपातीला वाव नसेल, असे विश्लेषकांचे मत आहे. महागाई दराने मार्चमधील ४.८३ टक्क्यांवरून सरलेल्या एप्रिलमध्ये ५.३९ टक्के असा चढ दाखविला आहे.