मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांच्या पतधोरणाने महागाईवर नियंत्रण मिळविले असल्याची पावती देत मूडीज् या अमेरिकी वित्तसंस्थेने नव्या गव्हर्नरांकडूनही राजन यांच्या कार्याच्या कित्ता गिरविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मूडीज् गुंतवणूकदार सेवेचे वरिष्ठ उपाध्यक्ष (सार्वभौम जोखीम समूह) मारी डिरॉन यांनी, भारताचा गुंतवणूकविषयक ‘बीएए३’ हा दर्जा राखण्यामागेही पतधोरणाची परिणामकता हेच गणित होते, असे स्पष्ट केले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणामुळेच गेल्या दोन वर्षांत महागाईचा दर सातत्याने सावरल्याचे नमूद करून रिझव्‍‌र्ह बँक यापुढेही अशीच धोरणे राबवेल, अशी अपेक्षा मूडीज्ने येणाऱ्या नव्या गव्हर्नरांबाबत व्यक्त केली आहे.
राजन यांचा गव्हर्नरपदाचा कालावधी येत्या महिन्यात ४ रोजी संपुष्टात येत आहे. तर बँकेचे आगामी पतधोरण येत्या ४ ऑक्टोबर रोजी आहे. गव्हर्नरपदाच्या मुदतवाढीवरून राजन चर्चेत आल्यानंतर त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त करत पद सोडण्याची तयारी दर्शविली. नवीन गव्हर्नरांच्या नावांच्या चर्चेत मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन तसेच निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया हे आहेत. किरकोळ महागाई म्हणजे जूनमधील ग्राहक किंमत निर्देशांक ६.०१ टक्क्य़ांवर गेला आहे. हा दर गेल्या जवळपास दोन वर्षांच्या वरच्या टप्प्यावर आहे. मात्र दमदार मान्सूनच्या जोरावर तो कमी होण्याची शक्यता तसेच वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीने तो वाढण्याची भीतीही कायम आहे. पुढील पाच वर्षांसाठी महागाईच्या ४ टक्के दराचे अंदाज रिझव्‍‌र्ह बँक तसेच सरकार स्तरावर बांधले गेले आहेत.